कोरोनाने शिकविला बचतीचा मार्ग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:07+5:302021-07-11T04:06:07+5:30
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सगळीकडे बंदची परिस्थिती होती. या काळात वाहतूक, कार्यालये, बाजारपेठा, उद्योगधंदे सर्वकाही ठप्प ...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सगळीकडे बंदची परिस्थिती होती. या काळात वाहतूक, कार्यालये, बाजारपेठा, उद्योगधंदे सर्वकाही ठप्प होते. परिणामी अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले, तर अनेकांचा पगार निम्म्यावर आला. त्यामुळे मागील वर्षभरापासून नागरिक मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. एकंदरीत कोरोनाने सामान्य नागरिकांना 'बचतीचा मार्ग' शिकविल्याचे चित्र दिसत आहे.
सामान्य दिवसांमध्ये अनावश्यक केले जाणारे खर्च होते, तेदेखील बंद झाले आहेत. रोजच्या जीवनातल्या बारीक-बारीक गोष्टींमध्ये नागरिक आता कॉस्टकटिंग करू लागले आहेत. कोणी बाहेरचे चमचमीत पदार्थ खाणं सोडून दिले आहेत. कुणी इंधनाच्या दरवाढीमुळे दुचाकी व चारचाकी चालवणे बंद केले आहे, तर कुणी महागडे कपडे घालणं बंद केले आहे. एकंदरच या कोरोनाने सर्व नागरिकांना कॉस्टकटिंग शिकविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुठे कुठे केली कॉस्टकटिंग?
- लॉकडाउनच्या काळात घराबाहेर पडणे कमी झाल्यामुळे नवीन कपडे घेतले नाहीत, तसेच महागडे व ब्रँडेड कपडे घेण्याऐवजी लोकल ब्रँडचे कपडे घेतले.
- कोरोनाच्या काळात बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळायला सांगितल्याने रेस्टाॅरंटमध्ये जाऊन खाणे बंद झाले. त्याचप्रमाणे ऑनलाइन डिलिव्हरी ॲपवरून जेवण मागवणे देखील बंद झाले.
- वाहतूक, पर्यटनस्थळे, देवस्थान बंद असल्याने दर महिन्याला येणारा प्रवास खर्च टाळता आला.
- कार्यालये व वाहतूक बंद असल्याने प्रवास खर्च, त्याचप्रमाणे दररोज खाल्ले जाणारे फास्टफूड तसेच कटिंग चाय यांच्या खर्चावर नियंत्रण आले.
- दरवेळी सलून किंवा पार्लरमध्ये जाणे आता बंद केले आहे. त्याऐवजी इंटरनेटवरील व्हिडिओ पाहून घरच्या घरी हेअर कटिंग व पार्लरचे काम करण्यात येत आहे.
- शहरात फिरण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर टाळला जात आहे. त्याऐवजी सायकलचा वापर वाढला आहे.
कुटुंबाचा स्कूल बसचा व्यवसाय आहे. कोरोनाच्या काळात शाळा संपूर्णपणे बंद असल्याने मागील दीड वर्ष व्यवसायही ठप्प आहे. परिणामी बस जागेवर उभ्या आहेत. काही उत्पन्न नसल्याने बऱ्याच गोष्टींमध्ये कॉस्टकटिंग सुरू आहे. अगदी मांसाहारी खाण्यापासून ते फास्टफूड खाण्यावर घरात काटकसर केली जात आहे.
- दर्शना पवार, गृहिणी.
कोरोनाच्या काळात निम्मा पगार झाला आहे; परंतु महागाई मात्र वाढत चालली आहे. यासाठी घरात विजेची काटकसर व खाण्यापिण्यातील गोष्टींवर काटकसर केली जात आहे.
- सुनेत्रा पांचाळ, गृहिणी.
कोरोनामुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. यामुळे मागील वर्षभरात आम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो नाही. त्याचप्रमाणे सिनेमागृह बंद असल्याने कोणताही सिनेमा पाहायला गेलो नाही. त्यामुळे महिन्याला चार ते पाच हजारांची बचत होत आहे.
- श्रद्धा सावंत, गृहिणी.