लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विमानतळावर कोरोना चाचणी आणि हॉटेल विलगीकरणाच्या नावे घोटाळा सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक सुफियान वानू यांनी केला आहे. कोरोनाची लागण न झालेल्या प्रवाशाला पॉझिटिव्ह दाखवून खासगी हॉटेलमध्ये पाठविले जाते. प्रयोगशाळा आणि पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे. या प्रकरणाची तत्काळ निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
विमानतळावरील प्रयोगशाळेने पॉझिटिव्ह घोषित केलेल्या महिलेला वनू यांनी पालिकेच्या रुग्णालयात नेत पुन्हा चाचणी केली. अवघ्या सात तासांत तिची चाचणी निगेटिव्ह आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १३ मे रोजी प्रसिद्ध केले होते. पालिका आयुक्तांनी परिमंडळ ३ चे उपायुक्त पराग मसूरकर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी वनू यांचे आरोप खोडून काढीत त्यांच्यामुळे शासकीय नियमावलीचा भंग झाल्याने साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस केली; परंतु वनू यांनी यावर आक्षेप घेतला आहे. आपण ज्या व्यक्तीवर आरोप केले त्यांनाच तपास अधिकारी कसे काय नेमले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
विमानतळावरच्या प्रयोगशाळेतील कर्मचारी, तेथे तैनात असलेले पालिका अधिकारी संगनमत करून प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह दाखवितात आणि खासगी हॉटेलमध्ये विलगीकरणाची सक्ती करतात. हॉटेल मालकांच्या फायद्यासाठी हे प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पालिकेचे म्हणणे...
विमानतळावरील प्रयोगशाळेशी पालिकेचा कोणताही संबंध नाही. प्रवाशांच्या अहवालाची तपासणी विमानतळ कर्मचारी करतात. त्यात पालिकेचा सहभाग नसतो. के पूर्व विभागाच्या वॉर रूमला संबंधित पॉझिटिव्ह प्रवाशाची माहिती मिळाल्यानंतर जेनेसिस हॉटेलमध्ये विलगीकरणाची नि:शुल्क सोय केली होती. कोरोनाबाधिताला विलगीकरणात राहणे बंधनकारक असतानाही सुफियान वनू संबंधिताला परस्पर स्वतःच्या गाडीतून घेऊन गेले. त्यांनी नियमावलीचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाईची शिफारस केल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.
मी ज्या अधिकाऱ्यावर आरोप केले त्यांनाच चौकशी अधिकारी नेमण्यात आले. त्यांनी सीसीटीव्ही तपासण्याचीही तसदी घेतली नाही. त्यांचे सर्व आरोप बेछूट आहेत. मी एकटाच नाही तर सोशल मीडियावर हजारो प्रवाशांनी विमानतळावरील चाचणी घोटाळ्याबाबत भाष्य केले आहे. आयुक्तांना या घोटाळ्याचा पर्दाफाश करायचा असल्यास निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत तपास करावा.
-सुफियान वनू, नगरसेवक, काँग्रेस