राज्य सरकारचे निर्देश; आतापर्यंत ३ लाख चाचण्यांचा टप्पा पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मुंबई) आता ६०० रुपयांत कोरोना चाचणी करण्यात येईल. राज्य सरकारच्या सूचनेनुसार कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. याआधी येथे कोरोना चाचणीसाठी ८५० रुपये आकारले जात होते.
६ सप्टेंबर २०२० पासून मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास तीन लाख प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोरोना चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. चाचणी केल्यापासून ७२ तासांपर्यंतचा अहवाल वैध मानला जातो. एखाद्या प्रवाशाकडे तसा अहवाल नसल्यास त्याची गैरसोय होऊ नये यासाठी विमानतळावर कोरोना चाचणी करण्यात येते.
मुंबई विमानतळावर केल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल आठ तासांत देण्यात येतो. त्यासाठी ८५० रुपये शुल्क आकारले जाई. मात्र, राज्य शासनाच्या सूचनेनुसार १ एप्रिलपासून ६०० रुपयांत चाचणी केली जात आहे. शिवाय तत्काळ अहवालाची सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासाठी ४५०० रुपये शुल्क आकारले जाते. हा अहवाल १३ मिनिटांत देण्यात येतो, असे मुंबई विमानतळ प्रशासनाने सांगितले.
.....................