नवी मुंबई : कोरोना नियंत्रणासाठी महानगरपालिकेने उपाययोजना वाढविण्यास सुरुवात केली आहे. मनपा व खासगी प्रयोगशाळेतून २४ तासांत तपासणी अहवाल उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. विभागनिहाय समन्वय अधिकाऱ्याची नियुक्तीही केली असून, खासगी रुग्णालयांनाही समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मनपा प्रशासनाने मिशन ब्रेक द चेन अभियानाची आणखी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी बैठक घेऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील आठही विभागांकरिता समन्वय अधिकारी नियुक्ती केले आहेत. कंटेन्मेंट क्षेत्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी विभाग अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रुग्ण संख्येप्रमाणे कंटेन्मेंट झोनची कॅटॅगरी निश्चित करण्यात यावी. संबंधित ठिकाणी बॅनर लावणे, सॅनिटायझेशन करणे, पोलीस विभागासह त्या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विभाग कार्यालय स्तरावर वॉर रूम तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. शहरातील प्रत्येक खासगी रुग्णालयांनीही समन्वय अधिकारी नियुक्त करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सिडको एक्झिबिशन सेंटर येथे कॉल सेंटर कार्यान्वित करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या असून, नागरिकांना बेड्सची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हेल्पलाइन नंबरही लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महानगरपालिका प्रयोग शाळेतून कोरोना चाचणीचा अहवाल २४ तासांत उपलब्ध होत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांवर जबाबदारीगृहविलगीकरणात असलेल्या व्यक्ती घराबाहेर पडणार नाहीत याची जबाबदारी सोसायटी पदाधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात यावी. गृहविलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर स्टँप मारण्यात यावेत, गृह विलगीकरणातील व्यक्ती घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
कोरोना चाचणीचा अहवाल चोवीस तासांत उपलब्ध करा, नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 3:58 AM