Join us

धारावीत आठ दिवसांत पुन्हा होणार सर्वांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 1:33 AM

किरण दिघावकर यांची माहिती

शेफाली परब - पंडितलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुक्तीच्या धारावी पॅटर्नचे कौतुक संपूर्ण जगात झाले. देशपातळीवरच नव्हे तर वॉशिंग्टन पोस्ट, जागतिक बँकेनेदेखील या लढ्याची दखल घेतली. मात्र कोरोनाचा विळखा सुटण्याची चिन्हे असताना या परिसरात बाधित रुग्णांचा आकडा गेल्या महिन्यापासून झपाट्याने वाढत आहे. सध्या ७१ सक्रिय रुग्ण असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाकाळात इतरांसाठी आदर्श ठरणारी धारावी नव्या आव्हानांचा सामना कसा करणार? याविषयी महापालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी केलेली ही बातचीत : धारावीत रुग्ण पुन्हा वाढण्याचे कारण काय?- धारावीत कोरोना रुग्णांची संख्या १०वर आली होती. मात्र आता दररोज बाधित रुग्णांचा आकडा दोन अंकी झाला आहे. यासाठी दोन कारणे आहेत, ते म्हणजे मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू करण्यात आली आहे, तर दुसरे, लॉकडाऊननंतर पुन्हा मुश्किलीने काम मिळाल्यामुळे लोक क्वारंटाइन होण्यास तयार नाहीत. त्यामुळे लोकांकडूनही माहिती लपवली जात असल्याने धोका वाढतो. त्यामुळे आता मोबाइल व्हॅनद्वारे थेट त्यांच्या दारात जाऊन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी बाधित रुग्णांची संख्या अधिक असलेल्या परिसरांचे मॅपिंग करून त्या ठिकाणी मोबाइल व्हॅन उभी करण्यात येत आहे. त्याचबरोबर या परिसरातील नऊ आरोग्य केंद्रांद्वारे जास्तीत जास्त लोकांची चाचणी केली जात आहे. कोरोनाचे आव्हान यावेळी कसे थोपवणार ?- धारावीत सामुदायिक शौचालय असल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. तसेच शौचालयांचा वापर कोणीही करीत असल्याने अतिजोखमीच्या व्यक्ती शोधणे शक्य होत नाही. त्यामुळे दारोदारी जाऊन ताप, थंडी, सर्दी अशी लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी केली जात आहे. कोरोना चाचणी करण्याची मुबलक साधनं असल्याने आता ऑन दि स्पॉट चाचणी केली जाते. पुढच्या आठ दिवसांत संपूर्ण धारावीत पुन्हा एकदा तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये संशयित आढळलेल्या लोकांची त्वरित चाचणी केली जाणार आहे.  सार्वजनिक शौचालयांमधून संसर्ग कसा रोखणार?- सार्वजनिक शौचालयातूनच प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. म्हणूनच गेल्यावेळी प्रमाणे दररोज दिवसातून पाच ते सहावेळा शौचालयांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. एवढेच नव्हे तर बाधित रुग्ण ज्या परिसरात आढळून येत आहेत, त्यांच्या घराचे व परिसराचेही निर्जंतुकीकरण केले जात आहे. 

प्रादुर्भाव कोणत्या भागात अधिक आहे? गेल्या महिन्यापासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली तेव्हा म्हाडा, एसआरएच्या इमारतींमध्ये बाधित रुग्ण सापडत होते. मात्र आता ही वाढ झोपडपट्टीमध्येही दिसून येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची चाचणी त्वरित करून कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात एक समाधानाची बाब अशी की, बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाही. परिणामी, आरोग्य यंत्रणेवरील ताण येथे कमी आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या