Join us

Coronavirus: मुंबईतील मृत्यूंची संख्या दडवण्याचं काम; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 9:48 PM

Decreasing number of tests in the state including Mumbai, low number of RT-PCR tests, Devendra Fadnavis Letter to CM: गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतसुद्धा कमी संख्येने चाचण्या केल्या जात असल्याबद्दल मी संपूर्ण आकडेवारीसह सातत्याने आपणाशी पत्रव्यवहार केला होता

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात सुद्धा अवघ्या ४० लोकसंख्येत ८ दिवसांचा सरासरी काढली तरी २६ हजार ७९२ चाचण्या प्रतिदिन आहेत२६ एप्रिल रोजी मुंबईतील २८ हजार चाचण्यांमधील ४० टक्के अँटिजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ १६ हजार ८०० आरटी पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत.आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या वर हवे असे केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही.

मुंबई – राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ठाकरे सरकारची चिंता वाढवलेली आहे. यातच मुंबईसह राज्यात कमी होत असलेल्या चाचण्या, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी, संसर्ग वाढण्याचा धोका, राज्यातील एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू मुंबईत होऊन सुद्धा जुन्या नोंदी अपडेट न होणे, त्यातून नेमकी माहिती कोरोना लढ्यासाठी उपलब्ध न होणे अशा प्रकारचे विविध आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केले आहे.(BJP Devendra Fadnavis Letter to CM Uddhav Thackeray over Current Corona situation of Mumbai)   

देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणतात की, गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतसुद्धा कमी संख्येने चाचण्या केल्या जात असल्याबद्दल मी संपूर्ण आकडेवारीसह सातत्याने आपणाशी पत्रव्यवहार केला होता. आज दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असताना पुन्हा एकदा काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मुंबईत गेल्या ८ दिवसात झालेल्या चाचण्यांच्या संख्येकडे लक्ष वेधू इच्छितो. १९ एप्रिलला ३६ हजार ५५६, २० एप्रिलला ४५ हजार ३५०, २१ एप्रिलला ४७ हजार २७०, २२ एप्रिलला ४६ हजार ८७४, २३ एप्रिलला ४१ हजार ८२६, २४ एप्रिलला ३९ हजार ५८४, २५ एप्रिलला ४० हजार २९८ तर २६ एप्रिलला २८ हजार ३३८ चाचण्यांची सरासरी दिवसाला ४० हजार ७६० येते.

नागपूर जिल्ह्यात सुद्धा अवघ्या ४० लोकसंख्येत ८ दिवसांचा सरासरी काढली तरी २६ हजार ७९२ चाचण्या प्रतिदिन आहेत. ६८ लाखांच्या पुण्यात सुद्धा सरासरी २२ हजार चाचण्या प्रतिदिन होत आहेत असं असताना या शहरांच्या ३-४ पट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ ४० हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही. त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात कठीण होऊन बसेल अशी भीती देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

दुसरा प्रश्न आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्यांच्या संख्येचा आहे. राज्यात जवळजवळ ४० टक्के चाचण्या अँटिजेन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे २६ एप्रिल रोजी मुंबईतील २८ हजार चाचण्यांमधील ४० टक्के अँटिजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ १६ हजार ८०० आरटी पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने १४-१५ टक्के असताना राज्याचा संसर्ग दर २५-२७ टक्क्यांचा आसपास राहत असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यात कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजिबात परवडणारे नाही असं फडणवीस म्हणाले.

तसेच रविवारी राज्यात एकूण २ लाख ८८ हजार २८१ चाचण्या नोंदवण्यात आल्या. त्यातील १ लाख ७० हजार २४५ आरटी पीसीआर चाचण्या होत्या. तर १ लाख १८  हजार ०३६ चाचण्या रॅपिड अँटिजेन चाचण्या होत्या. सोमवारी सुद्धा हेच चित्र दिसले. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या वर हवे असे केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही. मुंबईच्या बाबतीत अतिशय सजगतेने काम करण्याची गरज आहे. कारण मुंबईतून संक्रमित गावी गेले आहेत. गेल्या लाटेत ट्रँकिंग आणि ट्रेंसिंग जसे झाले होते तसे आता होताना दिसत नाही. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. मुंबईची मृत्यूसंख्या सातत्याने दडविण्याचं काम होते आहे असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे

टॅग्स :देवेंद्र फडणवीसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमुंबई