गेटवेवर आता कोरोना चाचणीची सक्ती नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:06 AM2021-04-03T04:06:37+5:302021-04-03T04:06:37+5:30
'लोकमत'च्या वृत्ताची दखल, लांबलचक रांगांमधून संसर्गाच्या भीतीने पर्यटकांनी फिरविली होती पाठ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेटवे ऑफ इंडियावर ...
'लोकमत'च्या वृत्ताची दखल, लांबलचक रांगांमधून संसर्गाच्या भीतीने पर्यटकांनी फिरविली होती पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेटवे ऑफ इंडियावर आता पर्यटकांना कोरोना चाचणीची सक्ती न करता प्रवेश देण्यात येणार आहे. चाचणीसाठी एकच काऊंटर असल्याने लांबलचक रांगांमधून संसर्गाच्या भीतीमुळे पर्यटक गेटवेवरून माघारी परतत होते. त्यामुळे जलपर्यटनावर विपरीत परिणाम झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत उपरोक्त आदेश देण्यात आले आहेत.
पर्यटकांनी पाठ फिरवल्याने गेटवेवरील फेरीबोट व्यावसायिक संकटात सापडले होते. त्यामुळे काउंटर्सची संख्या वाढवा अथवा चाचणीची सक्ती रद्द करा, अशी मागणी त्यांच्याकडून पालिकेकडे करण्यात आली होती. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता आंबेरकर आणि स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी शुक्रवारी गेटवे ऑफ इंडियाला भेट देत या व्यावसायिकांचे म्हणणे जाणून घेतले.
फेरीबोट व्यावसायिकांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार, गेटवे ऑफ इंडियावर येणाऱ्या पर्यटकांना कोरोना चाचणीची सक्ती न करता आत सोडले जाईल. त्याचप्रमाणे मुंबईहून जलपर्यटनासाठी जाणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार नाही. मात्र, अन्य ठिकाणांहून फेरीबोटीने मुंबईत येणाऱ्यांची चाचणी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सहकारी संस्थेचे सरचिटणीस किफायत ऊर्फ मामू मुल्ला यांनी दिली.
याबाबत पालिकेच्या ए विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
* काउंटरची संख्या वाढविली
पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी येथील काेराेना चाचणीसाठीच्या काउंटरची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन आता चार काउंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
...................