लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच मास्कसक्तीही करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होऊ लागल्याने मुंबई विमानतळावर परदेशी प्रवाशांची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीन, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपान येथून येणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंगच्या ७२ तास आधी कोविड आरटी-पीसीआर नकारात्मक अहवाल अपलोड करणे बंधनकारक केले होते. ही चाचणी नकारात्मक असेल तरच भारतात प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. चीनमध्ये कोरोनाच्या उद्रेकानंतर हे पाऊल उचण्यात आले होते. मुंबई विमानतळ प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचण्या सुरू केल्या होत्या. या दरम्यान काही तुरळक प्रवासी कोरोनाबाधित आढळले होते. हळूहळू ही संख्या कमी होत शून्यावर आली आहे.