राज्यात कोरोना चाचण्यांत २३ टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:16 AM2021-01-08T04:16:34+5:302021-01-08T04:16:34+5:30
मुंबई : मागील दोन महिन्यांत राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. राज्याच्या आऱोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ ...
मुंबई : मागील दोन महिन्यांत राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. राज्याच्या आऱोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३६ लाख ८२ हजार ४६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात ४७ लाख ५५ हजार ८३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या कालावधीत दैनंदिन कोरोना चाचण्यांमध्येही घट झाली असून हे प्रमाण ७९ हजारांवरून ६१ हजारांवर आल्याचे दिसून आले.
राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने परिणामी चाचण्याही कमी झाल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, ज्या प्रमाणात कोरोना चाचण्यांची आवश्यकता आहे, त्याप्रमाणात त्या केल्या जात आहेत. केवळ चाचण्यांचे सांख्यिक लक्ष्य असावे या उद्देशाने काम केले जात नाही, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे प्रमाण कमी झाले आहे. १ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात ८.७० लाख आणि १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत २.४८ लाखाने रुग्णसंख्या कमी झाली आहे. परिणामी, रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये घट झाली आहे.
राज्यातील नवीन कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी आरोग्य विभागाला कोरोना चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात मंगळवारी ५७ हजार ११० कोरोना चाचण्या करण्यात आल्यात, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी आहे. राज्यात मुंबई, अकोला, औरंगाबाद, बुलडाणा, कोल्हापूर, नागपूर, नंदूरबार, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येतात. केवळ सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यांत हे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे.