Corona Third Wave: मुंबईत पाचवे सिरो सर्वेक्षण सुरू, आठ हजार नमुने घेण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 09:35 PM2021-08-12T21:35:58+5:302021-08-12T21:36:28+5:30
Corona Third Wave : बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये निवडक जनरल प्रॅक्टीशनर्स यांच्या दवाखान्यात सर्वेक्षणाबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
मुंबई - कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. या विषाणूशी लढण्यासाठी किती टक्के लोकसंख्येत प्रतिपिंड तयार झाली आहे याचा अंदाज घेण्यासाठी सिरो सर्वेक्षण करण्यात येथे आतापर्यंत महापालिकेने चार सर्वेक्षण केले आहेत. तर पाचवे सर्वेक्षण गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये एकूण आठ हजार नमुने संकलित करुन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
कोविड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून उच्चभ्रू वस्ती, मध्यमवर्गीय, झोपडपट्टी, सोसायटी आदी परिसरातील रहिवाशांमध्ये किती प्रमाणात प्रतिपिंड तयार झाल्या, हे तपासण्यासाठी सातत्याने सीरो सर्वेक्षण (रक्त नमुने संकलन करुन सर्वेक्षण) केले जाते. त्यानुसार पहिले व दुसरे सर्वेक्षण जुलै व ऑगस्ट २०२० मध्ये तीन प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले. तर तिसरे सर्वेक्षण मार्च २०२१ तर चौथे सर्वेक्षण लहान मुलांकरीता मे ते जून २०२१ या कालावधीमध्ये सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले.
यावेळेस सर्व २४ विभागातील दवाखान्यांमार्फत पाचवे सिरो सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. बिगर झोपडपट्टी परिसरांमध्ये निवडक जनरल प्रॅक्टीशनर्स यांच्या दवाखान्यात सर्वेक्षणाबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या सर्वेक्षणात एकूण आठ हजार नमुने घेण्यात येणार असून त्यांची चाचणी सायन रुग्णालयात करण्यात येणार आहे. आयडीएफसी आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे.