Join us

लसीचे दोन्ही डोस घेऊनही तीनदा कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलुंडमधील एक २६ वर्षीय डॉक्टर जून २०२० पासून तीन वेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुलुंडमधील एक २६ वर्षीय डॉक्टर जून २०२० पासून तीन वेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही ही डॉक्टर दोनदा कोरोना पॉझिटिव्ह झाली. आतापर्यंत तीनवेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या डॉक्टरचे नाव सृष्टी हलारी असे आहे.

मुंबईमधील संसर्गासंदर्भात जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच कोरोना विषाणूच्या रचनेमधील बदल आणि जडणघडण अभ्यास करण्याच्या उद्देशाने सध्या वेगवेगळ्या भागांमधील नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून डॉक्टर सृष्टी यांचा स्वॅबही घेण्यात आला आहे. अशाप्रकारे पुन्हा-पुन्हा संसर्ग होणे हा गोंधळात टाकणारा प्रकार असल्याचे डॉ. हलारी सांगतात.

लसीकरणानंतरही डॉ. सृष्टी यांना कोरोना संसर्ग कसा झाला, याची तपासणी करण्यासाठी स्वॅब गोळा करण्यात आला आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये बीएमसी आणि खासगी रुग्णालयात नमुने देण्यात आले आहेत. संसर्गाचे कारण शोधण्यात येत आहे. पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कार्यरत असताना डॉ. हलारी १७ जून २०२० रोजी पॉझिटिव्ह आढळल्या. त्यानंतर यावर्षी २९ मे आणि ११ जुलै रोजी त्यांना संसर्ग झाला. डॉ. सृष्टीवर उपचार करत असलेले डॉक्टर मेहुल ठक्कर यांनी सांगितले, ‘मे महिन्यात झालेला दुसरा संसर्ग जुलैमध्ये पुन्हा सक्रिय झाला असावा.’