कोरोना काळ : पिण्यासाठी पाणी मिळत नाही तर सारखे हात कसे धुणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:06 AM2021-05-26T04:06:17+5:302021-05-26T04:06:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना लाटेत सरकार वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करीत आहे; परंतु हात स्वच्छ धुण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना लाटेत सरकार वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करीत आहे; परंतु हात स्वच्छ धुण्यासाठी पाण्याची गरज असते; मात्र रस्त्यावर राहणाऱ्या बेघर नागरिकांना पिण्यासाठीच पाणी मिळत नाही; तर वारंवार हात धुण्यासाठी पाणी कुठून मिळणार? असा सवाल ‘जनता जागृती मंच’ने केला आहे.
जोगेश्वरी पूर्व येथे रेल्वेच्या जमिनीवर अंदाजे १५० पेक्षा जास्त कुटुंबे मागील ५ ते २० वर्षांपासून उघड्यावर राहत आहेत. उघड्यावर आणि रेल्वेच्या हद्दीत राहत असल्याने मुंबई महापालिका त्यांना कायदेशीर पाणी जोडणी देत नाही. यामुळे यांना शेजारील इंडस्ट्रिअल इमारती किंवा वस्त्यांमधून पाणी मागून मिळवावे लागते. मागील वर्षीच्या टाळेबंदीमध्ये या श्रमिक बेघरांना कुठेच पाणी मिळेना, तेव्हा जनता जागृती मंचने पूर्व विभाग कार्यालयाकडून मानवतेच्या आधारावर तात्पुरते नळ कनेक्शन मिळवून दिले होते; परंतु रेल्वेच्या जमिनीवर उघड्यावर राहणारे श्रमिक बेघर पाणी भरतात म्हणून पश्चिम रेल्वे प्रशासनाने पालिकेतर्फे देण्यात आलेली पाण्याची जोडणी तोडून टाकली. याबाबत जनता जागृती मंचने पालिका व रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र पालिकेने चालढकल करीत मानवतेच्या आधारावर दिलेले एक नळ कनेक्शन पूर्ववत केले नाही.
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकारने लावलेल्या टाळेबंदीमुळे पुन्हा या सुभाषनगर येथील श्रमिक बेघरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा कोरोनाच्या काळात मानवतेच्या आधारावर श्रमिक बेघरांसाठी नळजोडणी देण्याची मागणी जनता जागृती मंचचे अध्यक्ष नितीन कुबल यांनी महापालिका आणि राज्य सरकारकडे केली आहे. मुंबई महानगरपालिका दुसऱ्या टप्प्यातील लागलेल्या लॉकडाऊनमध्ये श्रमिक बेघरांसाठी खिचडी देण्याची व्यवस्था करीत आहे. खिचडी देण्याच्या सुविधेबरोबरच अत्यावश्यक म्हणून जगण्यासाठी आणि सुरक्षेसाठी पाणी देण्याची गरज असल्याचीसुद्धा कैफियत मांडत आहेत.