Join us

महाराष्ट्रातील कोरोना उपचार खर्चात वाढ !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 5:35 PM

अन्य राज्यांमध्ये मात्र खर्चाचे आकडे घटले; देशात सर्वात कमी खर्च महाराष्ट्रातील रुग्णालयांतच  

मुंबई : १५ जूनपर्यंत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांवरील सरासरी उपचार खर्च १ लाख १९ हजार रुपये होता. तर, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या दोन राज्यातील खर्च अनुक्रमे २ लाख ५० हजार आणि २ लाख ४१ हजार रुपये इतका होता. ६ आँगस्ट पर्यंतच्या आकडेवारीनुसार या दोन राज्यांतील सरासरी उपचार खर्च ४५ आणि २४ हजारांनी कमी होत असताना महाराष्ट्रातील खर्च मात्र १० हजारांनी वाढल्याची माहिती हाती आली आहे. मात्र, त्यानंतरही देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील खर्चाचा आकडा आजही सर्वात कमीच आहे.

६ आँगस्ट अखेरीपर्यंत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणा-या ९० हजार ६२४ रुग्णांनी विमा कंपन्यांकडे उपचार खर्चापोटीचे १४६३ कोटी रुपयांचे क्लेम सादर केले आहेत. त्यानुसार प्रति रुग्ण उपचारांचा खर्च १ लाख ६१ हजार ४७९ रुपये होत असल्याचे निष्पन्न होत आहे. महाराष्ट्रातील ३९ हजार ३५६ रुग्णांच्या ५०८ कोटींच्या क्लेमचा समावेश असून देशातील सरासरीपेक्षा राज्यातील खर्च ३२ हजार रुपयांनी कमी आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडे नोंदविलेल्या आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढता येतो. सर्वाधिक २ लाख ६३ हजार रुपये खर्च तेलंगणा राज्यातील रुग्णांना करावा लागत असल्याचे आकडेवारी सांगते.   

६ आँगस्टपर्यंत खासगी रुग्णालयांतील ६२ हजार २०६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले होते. तर, २६ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान दुर्देवाने १६६५ रुग्णांचा मृत्यू ओढावला होता. आरोग्य विम्यासाठी दावा दाखल केलेल्या ९० हजार ६२४ पैकी ५९ हजार ६४१ रुग्णांचे क्लेम मंजूर झाले आहेत. ती रक्कम ५६४ कोटी रुपये आहे.

---------------------

फक्त साडे चार टक्के रुग्णांकडे विमा : ६ आँगस्टपर्यंत देशात सुमारे ३७ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, यापैकी फक्त १६६५ रुग्णांकडेच (४.५ टक्के) आरोग्य विमा होता अशी माहितीसुध्दा हाती आली आहे. या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या २१ लाखांवर झेपावली होती. त्यापैकी १४  लाख २७ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. त्यापैकी ६० ते ६५ टक्के रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. मात्र, त्यापैकी आरोग्य विमा असलेल्या रुग्णांची संख्या जेमतेम ९० हजार ६३४ होती.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसलॉकडाऊन अनलॉक