मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनप्रमाणेच कडक निर्बंध घातल्याने गेल्या आठवड्यात कोरोना चाचण्यांत घट झाल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिली. सामान्यतः सोमवारी कमी नमुने मिळतात, कारण रविवारी चाचणी केंद्र बंद असतात, अशीही माहिती महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली.
मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. २६ एप्रिलपर्यंत आरटी-पीसीआर आणि अँटिजन मिळून ५५,४३,५०२ चाचण्या करण्यात आल्या. दरदिवशी अंदाजे ४५,००० चाचण्या होतात. मात्र, २२ एप्रिल २०२१ पासून राज्य सरकारने लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध घातल्याने काही चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
* दिवसाला एक लाख चाचण्यांचे लक्ष्य
काेराेना चाचण्या गर्दी असलेल्या सार्वजनिक ठिकाणी उदा. मॉल, रेल्वे स्टेशन, बाजाराची ठिकाणे येथे करण्यात येतात. मात्र, निर्बंध घातल्याने आता वर्दळ कमी झाली असून त्यामुळेच चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. दिवसाला एक लाख चाचण्या करण्याचे लक्ष्य आहे. एप्रिल महिन्यात ११,७२,५५९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. २०२० पासून करण्यात आलेल्या ५५,४३,५०२ चाचण्यांपैकी ६९ टक्के चाचण्या आरटी-पीसीआर तर ३१ टक्के चाचण्या या अँटिजन होत्या, अशी माहिती पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.
...........................