Join us

शंभर वर्षांवरील अडीच हजार जणांना कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 11:17 AM

राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत पुरुष रुग्णांचे प्रमाण ५९ टक्के आहे, तर महिला रुग्णांचे प्रमाण ४१ टक्के आहे

ठळक मुद्दे११ ते २० वयोगटातील ४,९५,७२१ मुला-मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे, हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येत ७.४५ टक्के आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  राज्यासह मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. मात्र राज्यात एकूण ६६ लाख ४९ हजार ८७३ कोरोना बाधित असून आतापर्यंत १ लाख ४० हजार ६३६ इतका आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये सर्वाधिक संसर्ग ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असणाऱ्या नागरिकांना झाला आहे. राज्यात १०१ ते ११० वयोगटातील अडीच हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अहवालातून उघड झाली आहे.राज्यात १०१ ते ११० वयोगटातील आतापर्यंत २ हजार ५२१ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, याचे प्रमाण ०.०४ टक्के आहे. तर सर्वाधिक संसर्ग ३१ ते ४० वयोगटातील व्यक्तींना झाला असून ही संख्या १४,७७,४७३ इतकी असून याचे प्रमाण २२.२२ टक्के आहे. याखेरीज, ९१ ते १०० वयोगटातील १३,८४३ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून हे प्रमाण ०.२१ टक्के आहे. 

राज्याच्या एकूण रुग्णसंख्येत पुरुष रुग्णांचे प्रमाण ५९ टक्के आहे, तर महिला रुग्णांचे प्रमाण ४१ टक्के आहे. राज्यात रुग्णालयात दाखल असणाऱ्यांपैकी १ हजार १९ रुग्ण गंभीर असून हे प्रमाण १८.२४ टक्के आहे. तर ३ हजार १९९ रुग्ण सौम्य, मध्यम, तीव्र आणि लक्षणेविरिहत आहेत. यांचे प्रमाण ५७.२४ टक्के आहे. त्याचप्रमाणे, रुग्णालयात दाखल असणाऱ्यांपैकी १ हजार ३७० रुग्ण अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर आहे, यांचे प्रमाण २४.५२ टक्के इतके आहे. राज्यात नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या २,११,९३१ लहानग्यांना कोविड झाला असून हे प्रमाण ३.१९ टक्के आहे. तर ११ ते २० वयोगटातील ४,९५,७२१ मुला-मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे, हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येत ७.४५ टक्के आहे.

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या