Join us

Corona Vacciene: कोरोना लस निर्मितीसाठी १५४ कोटी रुपयांचा प्रकल्प; हाफकिन’ला मुख्यमंत्र्यांची भेट  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 3:51 AM

हाफकिन संस्थेचे स्वत:चे असे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी

मुंबई : हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्यातर्फे मुंबईत कोरोना लसीचे उत्पादन करण्यात येणार असून, त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्रकल्प मुंबईत सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिली. मुख्यमंत्र्यांनी परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली व प्रयोगशाळेची पाहणीही केली. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, हाफकिन संस्थेचे स्वत:चे असे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी. अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी. लसीकरणाचा वेग वाढवता यावा, याकरिता हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात यावा. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, हाफकिन इन्स्टिट्यूटच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उषा पद्मनाभन, आदी उपस्थित होते.

१३० कोटी लस निर्माण करण्याची क्षमताहाफकिनमार्फत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत अंदाजे १३० कोटी लस निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणाऱ्या उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी करण्यात यावीत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाचे हस्तांतरण उत्कृष्ट दर्जाची लसनिर्मिती व पुरवठा यावर भर देताना हाफकिनने औषध निर्माण करण्याबरोबरच कोरोना लसनिर्मितीसाठी आयसीएमआर / भारत बायोटेक लिमिटेडकडून  लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. परळ आणि पिंपरी येथील हाफकिनच्या केंद्रात लस उत्पादन केले जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :कोरोनाची लसउद्धव ठाकरे