मुंबई - घाटकोपर येथील १५ वर्षीय मुलीचा १२ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मात्र लसीकरणानंतर तिचा मृत्यू ओढावल्याची बातमी सामाजिक माध्यमांवर पसरल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेची शहानिशा केल्यानंतर दिल्लीतील एका डॉक्टरने ही अफवा पसरवल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
इयत्ता दहावीत शिकणारी आर्या गोविंद या मुलीचा बुधवारी आकस्मिक मृत्यू झाला. तिने ८ जानेवारी रोजी राजावाडी रुग्णालयात कोविड प्रतिबंधक लस घेतली होती. त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे डॉ. तरुण कोठारी यांनी ट्विट करीत खळबळ उडवून दिली. याचे वाईट परिणाम लसीकरण मोहिमेवर होण्याच्या भीतीने महापालिकेने या घटनेची चौकशी सुरू केली. यामध्ये मागील आठवड्यात घाटकोपरमध्ये कोणाला लसीकरणाचा त्रास झाल्याची कोणतीही तक्रार आरोग्य विभागाकडे आली नसल्याचे उजेडात आले.
कायदेशीर कारवाईचा इशारा...पालिकेने संबंधित डॉक्टरच्या पोस्टवर रिट्वीट करीत तुमचा संपर्क क्रमांक मिळाल्यास या प्रकरणी बोलता येईल. मात्र मुलीचा फोटो चुकीच्या हेतूने वापरत असल्याचे समोर आल्यास कायदेशीर कारवाईसाठी सज्ज रहा, अशी तंबी पालिकेने कोठारी यांनी दिली होती. मात्र यावर कोणतेही स्पष्टीकरण न देता डॉ. कोठारी यांनी पालिकेलाच आव्हान दिले आहे.
महापौरांनी घेतली आर्याच्या कुटुंबियांची भेट..या घटनेची वस्तुस्थिती आणि सत्यता जाणून घेण्यासाठी महापौरांनी शनिवारी घाटकोपर येथील संबंधित कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी लसीकरणामुळे नव्हे तर तिने अभ्यासाचा अतिताण घेतल्याने ते असह्य होऊन हृदयविकाराच्या धक्क्याने तिचा मृत्यू ओढवला असे आर्याच्या आजोबांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी सुरू असलेल्या राजकारणाचा निषेध व्यक्त करीत महापौरांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
एईएफआय समितीकडून मागविला अहवाल....याबाबत ट्वीट करणाऱ्या व्यक्तीसोबत रिट्विटद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. याप्रकरणी आता पोलीस चौकशी करीत आहेत. लस घेतल्यानंतर २४ तासांच्या कालावधीत त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. या घटनेत सदर मुलीने पाच दिवसांआधी लस घेतली होती. तरीही अडवर्स इव्हेंट फॉलोईंग इम्युनिझेशन (एईएफआय) या समितीला या प्रकरणाची शहानिशा करून अहवाल देण्याची विनंती केली असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.