मुंबई - केंद्रातून कोविड प्रतिबंधक लसींचा साठा मर्यादित स्वरूपात येत असल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्यामुळे कोविड लसींचे एक कोटी डोस विकत घेण्यासाठी महापालिकेने जागतिक स्तरावर निविदा मागवल्या आहेत. निविदा भरण्याची अंतिम मिळत १८ मेपर्यंत आहे. तसेच कार्यादेश मिळाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत लसींचा पुरवठा करणे बंधनकारक असणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २७ लाख ५७ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहेत. मात्र गेल्या महिन्यापासून लसींचा साठा मर्यादित स्वरूपात येत असल्याने मुंबईत गोंधळाचे वातावरण आहे. कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी मुंबईतील आणखी ५३ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
त्यामुळे महापालिकेने आता स्वतःच लस खरेदीची तयारी केली आहे. त्यानुसार बुधवारी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्ती प्रकाशित करून वेगवेगळ्या कंपन्यांनी प्रस्ताव सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. लस खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पालिकेने या निविदा जाहीर केल्या आहेत. १८ मे पर्यंत या निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निविदांची पडताळणी कार्यादेश देण्यात येणार आहे.
तीन आठवड्यात पुरवठ्याची मदतहे कार्यादेश मिळाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आता लसीकरण केंद्रांपर्यंत लस पुरविण्याची संबंधित कंपनीची जबाबदारी असणार आहे. २० रुग्णालये आणि २४० केंद्रात संबंधित कंपनीला थेट पुरवठा करावा लागणार आहे. मात्र या मुदतीत पुरवठा न झाल्यास अथवा मध्येच पुरवठा थांबल्यास दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद निविदेत आहे. तसेच,सरकारी प्रयोग शाळेत लसींची तपासणी केल्यानंतर पुरवठा सुरु करण्यात येणार आहे.
अशा आहेत अटीपरदेशातील कंपन्यांकडून लस खरेदी करण्यात येणार असली तरी त्यांना भारतीय आर्युविज्ञान परिषद, केंद्रीय औषध नियंत्रक यांची परवानगी असणे तसेच निकषांची पुर्तता करणे आवश्यक आहे. तसेच, अमेरिकन औषध प्रशासन, समकक्ष प्राधिकरणाची मंजुरी असणे बंधनकारक आहे. तर लसींचा पुरवठा करण्यापूर्वी चाचणीबाबतची सर्व माहिती सादर करणे बंधनकारक आहे.