Join us

Corona Vaccination : 'निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 4:05 PM

Corona Vaccination : राज्यातील लसीचा तुटवडा आणि त्यावरुन चाललेलं राजकारण यांसंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपा नेत्यांना टार्गेट केलं.

ठळक मुद्देराज्यातील लसीचा तुटवडा आणि त्यावरुन चाललेलं राजकारण यांसंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपा नेत्यांना टार्गेट केलं.

मुंबई - कोरोना लसीकरणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार, महाविकास आघाडीतील नेते आणि भाजपा नेते यांच्यात सामना रंगला आहे. त्यावरुन, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर कडाडून टीका केली. केंद्रीय सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, ते तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. जगाच्या इतिहासात असं मी कधी पाहिलं नव्हतं. आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायची, हे कोणतं राजकारण सुरू आहे?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. 

राज्यातील लसीचा तुटवडा आणि त्यावरुन चाललेलं राजकारण यांसंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपा नेत्यांना टार्गेट केलं. भारतीय जनता पक्षाचे एक विचारक आहेत, त्यांनी मत मांडताना महाराष्ट्रातील जनतेबद्दल अपशब्द पावरले. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आम्ही कोण आहोत, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा शब्दात राऊत यांनी संभजी भिडेंवर टीका केली. आतासुद्धा शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर, पळता भूई थोडी होईल, असेही राऊत यांनी म्हटले. 

भाजपलाही याच राज्यातील जनतेनं निवडून दिलंय. भाजपच्या 105 आमदारांना महाराष्ट्रातील जनतेनंच निवडून दिलंय. मग, या 105 आमदारांना मतदान दिलेले लोकं कोण आहेत, जो शब्द तुमच्या लोकांनी वापरलाय, असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या, ज्यांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलंय, ते कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र जेवढा तुमचा आहे, तेवढा आमचाही आहे. महाराष्ट्राची जनता जेवढी तुमची आहे, तेवढी आमचीही आहे. सगळ्यांचा आहे हा महाराष्ट्र, कुठल्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी महाराष्ट्रावर नाही, असेही राऊत यांनी म्हटले.   

टीकाकारांनी आपलं रक्त मराठी माणसाचं आहे की नाही हे तपासावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं रक्त तुमच्या धमन्यांमध्ये असेल, तर तुम्ही असं एकमेकांवर टीका करणार नाही. राजकीय मतभेद असू शकतात, पण आजचं संकट भयंकर आहे, असं राऊत म्हणाले. कोरोना विरोधातील जी लढाई आहे, ही आमची व्यक्तीगत लढाई नाही. आम्ही केंद्राच्या नेतृत्वात लढाई लढत आहोत. महाराष्ट्रातील जनता ही मोदींची जनता नाही का? असा सवालही राऊत यांनी केला.

टॅग्स :संजय राऊतकोरोनाची लसदेवेंद्र फडणवीसभाजपा