corona vaccination : महाराष्ट्रात गुरुवारी झाले उच्चांकी कोरोनाचे लसीकरण, दिवसभरात तीन लाखांहून अधिक जणांना दिली लस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:42 AM2021-04-02T05:42:06+5:302021-04-02T05:42:43+5:30
corona vaccination in Maharashtra : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मुंबई : राज्यात गुरुवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे तीन लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून एकाच दिवशी ५७ हजार जणांना लसीकरण करून पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला. त्यापाठोपाठ मुंबईत ५० हजार जणांचे लसीकरण झाले. महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे ६५ लाखांहून नागरिकांना लसीकरण करून पहिल्या क्रमांकात सातत्य राखले आहे. (High corona vaccination was given in Maharashtra on Thursday, more than three lakh people were vaccinated in a day)
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, रोज किमान पावणेतीन लाख नागरिकांना लस दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
विदर्भ : लाभार्थींमध्ये दिसला उत्साह!
nनागपूरमध्ये ८१ लसीकरण केंद्रांवर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी २ वाजेपर्यंत ५० टक्क्यांहून जास्त या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण झाल्याची माहिती आहे.
nअकोल्यात सायंकाळपर्यंत ३,५०० पेक्षा जास्त लाभार्थींनी लस घेतली.
nवाशिम जिल्ह्यातही ८८ केंद्रांवर ४५ वर्षे वयावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक जिल्ह्यात लसीचा तुटवडा
नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाची लस केवळ ग्रामीण भागातील काही केंद्रांवर उपलब्ध होती. शहरातील बहुतांश केंद्रांवर सकाळीच लस उपलब्ध नसल्याचे फलक लागले होते. गुरुवारी जिल्ह्याला १ लाख ९० हजार लस साठा प्राप्त झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात लसीच्या तुटवड्यामुळे १ एप्रिलपासून १४२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर सुरू करण्यात येणारे लसीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.
मराठवाडा : कुठे रांगा तर कुठे प्रतीक्षा
औरंगाबादेत सुरक्षित अंतर ठेवून दूरवर रांगा लागल्या होत्या.
बीड जिल्ह्यात ५१ आरोग्य केंद्र व ५४ उपकेंद्रांमध्ये लसीकरण झाले.
परभणी जिल्ह्यात ८ लसीकरण केंद्र वाढविली आहेत.
जालना जिल्ह्यात १८१ जणांनीच लस घेतली.
हिंगोलीत ३५६ नागरिकांना लस देण्यात आली.
नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्येही लसीकरणाला सुरुवात झाली.
पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात शिल्लक
मुंबई : राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात रक्तसाठा अपुरा पडला होता. त्यावेळी रक्तदानाचे आवाहन केले होते. मात्र आता संपूर्ण राज्यभरात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहनही शिंगणे यांनी केले.