राज्यात किशोरवयीन गटातील कोरोना लसीकरण मंदावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:32 AM2022-03-06T08:32:55+5:302022-03-06T08:33:12+5:30

५७ टक्के जणांनी घेतला पहिला डोस; लसीकरणात सांगली अव्वल

Corona vaccination in adolescent groups slowed down in the state | राज्यात किशोरवयीन गटातील कोरोना लसीकरण मंदावले

राज्यात किशोरवयीन गटातील कोरोना लसीकरण मंदावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात किशोरवयीन गटातील लसीकरण मोहीम मंदावली आहे. दुसरीकडे मुंबईतही सारखेच चित्र असून, आता या मोहिमेला गती देण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. 

राज्यात १५ ते १८ वयोगटातील ३० टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे; तर जवळपास ५९.५२ % मुलांनी कोविड लसीचा एक डोस घेतला आहे. १८ फेब्रुवारीपासून या आकड्यात किंचितशी वाढ झाली आहे. १८ फेब्रुवारीला राज्यात सरासरी २७ टक्के दोन्ही डोस आणि ५७ टक्के पहिला डोस झाला होता.

भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस ३ जानेवारीपासून १५-१८ वर्षे वयोगटातील मुलांना दिली जात आहे. राज्यासह मुंबईतील किशोरवयीन मुलांचे लसीकरणाचे प्रमाणही कमीच आहे. ३ मार्चपर्यंत शहरात पहिल्या डोसचे प्रमाण ५४ टक्के एवढे आहे, तर दोन्ही डोस देण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचले; तर पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे हेच प्रमाण १८ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे ४९.९ टक्के आणि २४.२ टक्के एवढे होते. याउलट सांगली आणि भंडारा हे दोन जिल्हे किशोरांच्या लसीकरणात आघाडीवर आहेत. सांगलीत ७३.८६ टक्के किशोरांना पहिला डोस आणि ५८.६७ टक्के किशोरांचे पूर्ण लसीकरण झाले आहे; तर भंडाऱ्यात पहिल्या डोसच्या लसीकरणाची टक्केवारी ८०.४५, तर दुसऱ्या डोसच्या लसीकरणाची टक्केवारी  ६१.२४ टक्के एवढी आहे.  

राज्यात ९१.५ दशलक्ष लाभार्थी 
याविषयी, राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, राज्यात ९१.५ दशलक्ष लाभार्थी आहेत. त्यापैकी १५ ते १८ वयोगटातील लोकसंख्या ६० लाख आहे. मुंबईचे चित्र पाहता, ६ लाख १२ हजार लाभार्थी आहेत. आता राज्यात निर्बंधमुक्ती होत आहे, संपूर्ण क्षमतेने शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने या मोहिमेची गती वाढेल, अशी आशा आहे.  त्याचप्रमाणे, दुसरीकडे  विविध उपक्रमांद्वारे लस साक्षरता वाढविण्यासाठीही प्रयत्न करत आहोत. येत्या काळात या मोहिमेचे चित्र प्रभावी व आणखी सकारात्मक असेल, असेही त्यांनी नमूद केले

Web Title: Corona vaccination in adolescent groups slowed down in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.