Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:30 AM2021-06-09T06:30:39+5:302021-06-09T06:31:52+5:30
Corona Vaccination : महापालिकेने स्पुतनिक लसीच्याशहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी भव्य शीतगृह उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबई : रशियातील कोविड प्रतिबंधक स्पुतनिक लसींचा साठा मुंबईला मिळावा, यासाठी मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याशी चर्चा सुरू असून जून अखेरीस थोड्या लसी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लसी साठविण्यासाठी मुंबईत जम्बो शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारण्यात येणार आहे.
एक कोटी लस खरेदीसाठी मागविलेल्या जागतिक निविदेतील स्पर्धक अपुऱ्या कागदपत्रांअभावी बाद ठरले. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून स्पुतनिक लसीचे भारतातील वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडून लसींचा काही साठा मिळविण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचा साठा करण्यासाठी विशेष शीतगृहाची आवश्यकता आहे. त्यामुळे महापालिकेने स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी विशेष शीतगृहासाठी जागेची चाचपणी सुरू केली आहे.
कांजूरमार्गसारखेच विशेष कोल्ड स्टोरेज उभारण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. महापालिकेने स्पुतनिक लसीच्याशहर, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी सोयीस्कर होईल, अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी भव्य शीतगृह उभारणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
लहान मुलांवरील प्रयाेगासाठी परवानगीची प्रतीक्षा
नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांवर लसीचे प्रयोग केले जात आहेत. मुंबई महापालिकेला अशी परवानगी मिळावी यासाठी केंद्राकडे संपर्क करण्यात आला आहे. मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही, अशी माहिती महापौरांनी दिली.
साठवणुकीचे निकष वेगळे
कांजूरमार्गसारखेच विशेष कोल्ड स्टोरेज उभारण्याचे महापालिकेचे प्रयत्न आहेत. स्पुतनिक लसींच्या शीतगृहातील साठवणुकीचे निकष वेगळे आहेत. जुलै व ऑगस्ट २०२१ या दोन महिन्यांमध्ये स्पुतनिक लसींचा साठा मोठ्या प्रमाणात देण्याबाबत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याकडे पालिकेने विचारणा केली आहे. त्यानुसार येत्या आठ ते दहा दिवसांत पुन्हा डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्याशी चर्चा केली जाईल.
लसींचा साठा विभागून ठेवण्याचा प्रयत्न
कांजूरमार्गच्या कोल्ड स्टोरेजमध्ये कोव्हिशिल्ड लसीचा साठा केला जातो. पण डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने लस दिली तर जागेची पाहणी करता येईल, पूर्व आणि पश्चिम अशाप्रमाणे विभागून लस साठवता येईल का? यावर चर्चा केली जाईल.
- किशोरी पेडणेकर, महापौर