मुंबई : राज्यात ७६९व्या लसीकरण सत्रात एकूण ५१ हजार २४० जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, ४१,२२५ जणांना लसीचा पहिला डाेस, तर १० हजार १५ जणांना दुसरा डाेस देण्यात आला. ७ हजार ४१० आरोग्य कर्मचारी तसेच ५,९७३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. राज्यात आतापर्यंत १३ लाख ७१ हजार ८८६ जणांना कोरोना लस देण्यात आली.
१० हजार १५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या ३ हजार ६५६ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील २४ हजार १८६ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ५० हजार २६३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड, तर ९७७ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले.
मुंबईत २ लाख ४५ हजारांहून लाभार्थ्यांना लस
राज्यात सर्व जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत २ लाख ४५ हजार ६५७ लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यानंतर पुणे १ लाख ३८ हजार ८६९, ठाणे १ लाख १६ हजार ३४१, नागपूर ६२ हजार १२६ आणि नाशिक ६२ हजार ४२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. राज्यात लसीकरणाला सर्वांत कमी प्रतिसाद हिंगोलीत ९ हजार ३९०, वाशिम १० हजार ६८६, परभणी १२ हजार ७२८, उस्मानाबाद १४ हजार ६७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.