- स्नेहा मोरेमुंबई : देशासह मुंबईत १० जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत दक्षता मात्रा म्हणजेच लसीचा तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली. मात्र राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत दक्षता मात्रा घेण्यात मुंबई आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच दिवसांत एकूण ६६,२१२ लाभार्थ्यांनी दक्षता मात्रा घेतली. मुंबईत आतापर्यंत २३,७३४ आरोग्य कर्मचारी, २७,५९२ फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६०हून अधिक वय असणाऱ्या १४,८८६ लाभार्थ्यांनी दक्षता मात्रा घेतली. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, दक्षता मात्रेसाठी जनजागृती उपक्रम हाती घेण्यात येत आहे. हे प्रमाण येत्या काही दिवसांत आणखी वाढेल.सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रावर ऑनलाइन किंवा थेट येऊन नोंदणी केली तरी बूस्टर डोस मिळत आहे. ज्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने उलटले आहेत किंवा ३९ आठवडे झालेत, त्यांनाच हा बूस्टर डोस मिळेल. यासाठी नोकरीचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे तसेच खासगी केंद्रात जरी लस घ्यायची असेल तरीसुद्धा सरकारी केंद्रावर येऊन वर्गवारी नोंदवावी लागेल. त्यानंतरच खासगी केंद्रावर लस घेण्याची मुभा आहे. विशेष म्हणजे सहव्याधी असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही. तसेच ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची, फ्रंटलाइन वर्कर्सची, ६० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांची नोंद कोविनमध्ये कर्मचाऱ्यांऐवजी नागरिक म्हणून नोंद झाली आहे, त्यांनाही शासकीय तसेच महापालिका केंद्रात थेट नोंदणी करून लस मिळत आहे....तर दक्षता मात्रा आणखी लांबणीवरराज्यातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आल्याने, पुढचे किमान तीन महिने ते बूस्टर डोस घेऊ शकणार नाहीत. यातून लसीकरणाच्या या टप्प्यात अडचण निर्माण झाली आहे. राज्यात सध्या ५९८ निवासी डॉक्टरांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
Corona Vaccination: बूस्टर डाेसमध्ये मुंबई आघाडीवर; पाच दिवसांत ६६ हजार लसवंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 8:06 AM