Corona Vaccination: अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण कासवगतीने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:29 AM2021-08-09T10:29:30+5:302021-08-09T10:30:11+5:30

केवळ २० टक्के नागरिकांनाच लाभ; सात महिन्यात अनेकदा तुटवडा

Corona Vaccination in Mumbai is slow due to insufficient supply | Corona Vaccination: अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण कासवगतीने

Corona Vaccination: अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण कासवगतीने

Next

मुंबई :  मुंबईत कोरोना लसीकरण मोहीम सुरू होऊन सात महिने होत आहेत. या सात महिन्यांत मुंबईच्या केवळ २० टक्के लोकसंख्येला कोरोनाचे दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यामुळे, मुंबईतील लसीकरण हे धीम्या गतीने सुरू असून लसीच्या अपुऱ्या पुरवठ्याने लसीकरणावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, काही महिन्यांत जास्त लसीकरण होत आहे तर काही महिन्यांत अगदीच कमी लसीकरण झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीनुसार समोर येत आहे. १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. यानंतर, पालिकेने १४ फेब्रुवारीपासून फ्रंट लाइन वर्कर्स, १ मार्चपासून वृद्ध आणि ४५ वर्षांवरील, १ मेपासून १८ वर्षांवरील आणि २ ऑगस्टपासून अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणाचे काम सुरू झाले आहे.

प्रत्येकाला लस मिळावी म्हणून पालिकेने टप्प्याटप्प्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली आहे. सध्या मुंबईत पालिकेचे २९३ आणि सरकारी आरोग्य योजनेंतर्गत २० केंद्रे चालवली जातात. याशिवाय ११४ खाजगी लसीकरण केंद्रे आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, पालिकेला सुरुवातीपासून आतापर्यंत फक्त ४९ लाखांहून अधिक लसीचे डोस मिळाले आहेत. यातील सुरुवातीला खासगी लसीकरण केंद्रांना ५ लाखांपेक्षा जास्त डोसचे वाटप करण्यात आले आहेत. १६ जानेवारी ते २ ऑगस्टपर्यंत पालिका केंद्रांमध्ये लोकांना ३८,२२,७७० डोस देण्यात आले आहेत तर सरकारी केंद्रांवर ४,१९,१९६ डोस देण्यात आले आहेत. तर खासगीत ३० लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. 

 मे आणि जुलै महिन्यात लसीकरणाचा वेग कमी होता. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये २० टक्के कमी लसीकरण झाले, तर एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ३४ टक्के लसीकरण झाले. पालिका आरोग्य विभागाने दररोज जाहीर केलेल्या लसीकरण अहवालानुसार, जानेवारी महिन्यात दररोज सरासरी १३०० लोकांना लसीचे डोस दिले जात होते, तर फेब्रुवारीमध्ये आलेख ६ हजारांवर पोहोचला. त्याचप्रमाणे मार्चमध्ये दररोज सरासरी ३१ हजार डोस दिले जात होते, जे एप्रिलमध्ये वाढून ४२ हजारांपर्यंत झाले. मात्र, मेमध्ये हा आलेख २८ हजारांवर घसरला. जूनमध्ये आलेख ७१ हजारांपर्यंत वाढला आणि त्यानंतर जुलै महिन्यात हा आकडा ५९ हजारांवर आला.

मुंबईत पालिकेचे २९३ केंद्रे
प्रत्येकाला लस मिळावी म्हणून पालिकेने टप्प्याटप्प्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली आहे. सध्या मुंबईत पालिकेचे २९३ आणि सरकारी आरोग्य योजनेंतर्गत २० केंद्रे चालवली जातात. याशिवाय ११४ खाजगी लसीकरण केंद्रे आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, पालिकेला सुरुवातीपासून आतापर्यंत फक्त ४९ लाखांहून अधिक लसीचे डोस मिळाले आहेत. 

Web Title: Corona Vaccination in Mumbai is slow due to insufficient supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.