Join us

Corona Vaccination : ‘लसीच्या उत्सवा’बाबत अजूनही मुंबईत साशंकता!, तुटवड्यामुळे ‘वाॅक इन’ लसीकरण बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 5:44 AM

Corona Vaccination : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. हळूहळू दिवसाला ४० ते ६० हजार लसीकरण होऊ लागले. कोविन ॲपवर नोंदणी केल्यावर लसीकरणाला कधी यावे याचा संदेश आला नाही तरी नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उत्सव साजरा करण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे मुंबईत हा उत्सव साजरा करण्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून भासणारा लसींचा तुटवडा कायम असून, अजूनही खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. शिवाय, वाॅक इन लसीकरण बंद केल्याचा फटकाही प्रक्रियेला बसल्याने लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावत चालल्याचे चित्र आहे.मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. हळूहळू दिवसाला ४० ते ६० हजार लसीकरण होऊ लागले. कोविन ॲपवर नोंदणी केल्यावर लसीकरणाला कधी यावे याचा संदेश आला नाही तरी नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली. मुंबईत लस उत्सव साजरा करण्यास पुरेसा लसींचा साठा उपलब्ध नसल्याची माहिती पालिका आराेग्य विभागाच्या अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. साठातीन दिवस पुरले इतका असल्याने पुन्हा शहर, उपनगरांत लसींचा तुटवडा जाणवू शकतो. या पार्श्वभूमीवर वारंवार केंद्र शासनाकडे लसीचा अधिकचा साठा देण्याबाबत मागणी कऱण्यात येत आहे.

१५ एप्रिलला नवीन साठ्याची उपलब्धतामुंबईत महानगरपालिकेला शुक्रवारी रात्री ९९ हजार लसीचे डोस मिळाले. त्यानंतर वीकेंड लाॅकडाऊन दरम्यान बंद कऱण्यात आली. काही लसीकरण केंद्रे पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. या साठ्यानंतर पुन्हा रविवारी मुंबई महानगरपालिकेला १ लाख ३४ हजार डोस मिळाले आहेत. या पुढील लसीचा साठा १५ एप्रिल रोजी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

लसीकरण केंद्रांवर वादावादीपालिकेने नोंदणीशिवाय लस न देण्याचे जाहीर केले. शिवाय, लसीकरणाच्या प्रक्रियेत दुसरा डोससाठी आलेल्यांना प्राधान्य दिले जात होते; तरीही पहिल्या डोससाठी उत्सुक लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बऱ्याच लसीकरण केंद्रांवर वादावादी झाल्याचेही दिसून आले. दरम्यान, मुंबईत १० एप्रिलला वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी २१ हजार ९४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण १६ लाख ३५ हजार ३७२ जणांचे लसीकरण झाले.

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस