मुंबईतील कोरोना लसीकरण : लसीकरणासाठी टास्क फोर्स, अंमलबजावणीसाठी ५०० पथके

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 07:42 AM2020-12-12T07:42:46+5:302020-12-12T07:45:27+5:30

Corona Vaccination :

Corona Vaccination in Mumbai: Task Force for Vaccination, 500 Squads for Implementation | मुंबईतील कोरोना लसीकरण : लसीकरणासाठी टास्क फोर्स, अंमलबजावणीसाठी ५०० पथके

मुंबईतील कोरोना लसीकरण : लसीकरणासाठी टास्क फोर्स, अंमलबजावणीसाठी ५०० पथके

Next

मुंबई :  कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर सिटी टास्क फोर्सच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणासाठी पाच जणांचे एक याप्रमाणे मुंबईत सुमारे ५०० पथके नेमली जातील. लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. यासाठी व्यवस्थापन प्रणाली तयार केली आहे. सर्वांत आधी आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, त्यानंतर वय वर्ष ५० पेक्षा अधिक आणि इतर/सहव्याधी असलेले नागरिक या क्रमाने लसीकरण करण्यात येणार आहे.

शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पूर्वतयारी वेगाने होत आहे. फोर्सच्या माध्यमातून मोहीम राबविली जाईल. फोर्सप्रमाणे क्षेत्रीय स्तरावरील समिती गठीत करण्याची कार्यवाही पूर्ण होईल. मनुष्यबळास आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. लसीकरण कार्यक्रमात सर्व सांख्यिकी माहिती संकलित करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म शासनाकडून तयार करण्यात आला आहे. पूर्व तयारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या टप्प्यांमध्ये सर्व यंत्रणांना जबाबदारी नेमून देण्यात आली आहे. 

सर्व यंत्रणांनी प्रत्येक टप्प्यावर नेमलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सिटी टास्क फोर्सच्या माध्यमातून देखरेख केली जाईल.
- सुरेश काकाणी, 
अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

प्रारंभी प्रत्यक्ष लसीकरण केंद्राचे एक मॉडेल उभारून, त्याचा अभ्यास करून त्याआधारे पुढील लसीकरण केंद्र उभारता येईल. मनुष्यबळासह आवश्यक ती यंत्रणा, सामग्री उपलब्ध करून समर्पितपणे ही मोहीम राबवू.
- देवीदास क्षीरसागर, उप आयुक्त, 
सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई महापालिका

कांजूरमार्ग येथील एका इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर लस साठवणुकीची पूर्वतयारी करण्यात आली आहे.
 ५ हजार चौरस फूट क्षेत्राची ही जागा प्रादेशिक लस भांडार म्हणून निर्देशित आहे.
 लस वाहतूक, साठवणूक, लसीकरण केंद्रातील व्यवस्था, लसीकरणाचे प्राधान्य या बाबींचे निर्देश ठरले आहेत.

कोरोना : लस विकत की फुकट...?
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता मुंबई महापालिका लसीकरणाची मोहीम हाती घेणार आहे. मात्र, नागरिकांच्या लसीकरणाबाबत आराखडा तयार नाही. नागरिकांना लस मोफत मिळणार का? हे ठरलेले नाही. याबाबतचा निर्णय केंद्र आणि राज्य घेईल. परिणामी, तिसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना मिळणारी लस मोफत की विकत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अशी लसीकरणाची मोहीम
 आठ ठिकाणी लसीकरण
 लस घेतल्यानंतर ३० मिनिटे तेथेच थांबावे लागणार
 शहरातील चार प्रमुख रुग्णालयासह 
उपनगरातील चार रुग्णालयात लसीकरण
 पहिला टप्पा १० ते १५ दिवसांत पूर्ण होणार
दोन डोस २१ ते २८ दिवसांच्या अंतराने

कुठे मिळणार लस?
 नायर दंत रुग्णालय
 नायर सर्वसाधारण रुग्णालय
 लो. टिळक रुग्णालयात
 कुर्ला भाभा  
 राजावाडी
 केईएम      
 वांद्रे-भाभा
 जागेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालय

Web Title: Corona Vaccination in Mumbai: Task Force for Vaccination, 500 Squads for Implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.