- स्नेहा मोरेमुंबई : राज्यात दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मास्कमुक्ती जाहीर केली, तसेच निर्बंधही हटविण्यात आले. तर दुसरीकडे राज्यात कोरोना लसीकरणाने १६ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. एकीकडे मुंबई शंभर टक्के लसवंत झाली असताना मास्कमुक्तीनंतरही ठाणेकर लसीकरणात पिछाडीवरच असल्याचे दिसून येत आहे. राज्यात ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेणाऱ्यांची संख्या तब्बल नऊ लाखांहून अधिक आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. दुसरी मात्रा न घेण्यात पुणे आघाडीवर राज्यात काेरोना दोन्ही लसीची दुसरी मात्रा न घेण्यात पुणेकर आघाडीवर आहेत. राज्यात दीड वर्षानंतरही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी प्रमुख जिल्ह्यांमधील लस उदासीनता खेदजनक असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात पुण्यात कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठी अजूनही १४,१२,५५० लाभार्थी तर कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या मात्रेसाठी २,६७,१७५ लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.
राज्यात ठाणे जिल्हा पहिला डोस न घेण्यात अग्रक्रमी आहे. त्याखालोखाल, जळगाव, नांदेड, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, सोलापूर, यवतमाळ, बुलडाणा हे जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे ४ ते ६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेली नाही.राज्यात रायगड, वर्धा, नागपूर, रत्नागिरी, गोंदिया, सातारा, सांगली, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये एक लाखांहून कमी लाभार्थी पहिली मात्रा घेण्यापासून वंचित आहेत.