Corona Vaccination: कोरोना लसीकरणासाठी पहाटे 3 वाजल्यापासून रांग; 10 वाजले तरी टोकन मिळेना !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 08:21 AM2021-08-08T08:21:24+5:302021-08-08T08:21:59+5:30
लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे हाल; नियाेजनाची मागणी
- सचिन लुंगसे
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरण केंद्रांवर ऑफलाईन म्हणजे लस घेण्यासाठी थेट दाखल होणाऱ्या नागरिकांना पहाटेच्या तीन वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे एवढा वेळ रांगेत उभे राहूनही लसीसाठीचे टोकन मिळेल की नाही? याची शाश्वती नसल्याने लसीकरण केंद्रांवर दाखल झालेल्या नागरिकांना आल्यापावली घरी परतावे लागत आहे.
कुर्ला येथील एल वॉर्डच्या अधिपत्याखाली माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसुतीगृह आहे. येथे एल वॉर्ड अंतर्गत लसीकरण केंद्र ८ मे रोजी सुरु करण्यात आले. येथे कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन्ही लसी दिल्या जातात. याबाबतच्या तारखा नागरिकांना ऑनलाईन व्यवस्थित मिळतात. मात्र, अडचण येते ती ऑफलाईन म्हणजे लसीकरणासाठी थेट येणाऱ्या नागरिकांची. कुर्ला विधानसभेतील भारतीय जनता पक्षाच्या १७१चे वॉर्ड अध्यक्ष तुषार शिर्के यांच्याकडील सविस्तर माहितीनुसार, ही अडचण केवळ कुर्ल्यापुरती मर्यादित नाही तर मुंबईत बहुतांश ठिकाणी थेट लसीकरणासाठी दाखल होत असलेल्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लसीकरणासाठी थेट दाखल होणाऱ्या नागरिकांना पहाटे तीन वाजल्यापासून लसीकरणासाठी रांग लावावी लागत असून, सकाळी दहा वाजता टोकन मिळत आहे. यामुळे या नागरिकांचे हाल होत आहेत.
ऑफलाईनचे टोकन देताना फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते, मग उर्वरितांना टोकन दिले जाते. हे करतानाही सर्वसामान्यांना जी टोकन द्यायची असतात ती पूर्णत: वितरित केली जात नाहीत. त्यामुळे जो नागरिक सकाळी पाच किंवा साडेपाच वाजता रांग लावतो त्याला परत जावे लागते. याबाबतचे पत्र मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसोबत इतर अधिकाऱ्यांनादेखील देण्यात आले आहे. मात्र, पत्राचे उत्तर अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे माहिती अधिकारात माहिती मागितली असता, केवळ नेमणूक करण्यात आलेल्या डॉक्टरांची माहिती देण्यात आली. बाकीच्यांचे ओळखपत्र देण्यात आले. स्वयंसेवकांबाबतच्या रकान्यात निरंक असे नमूद करण्यात आले आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या नियुक्तीपत्राचा उल्लेख नाही शिवाय फ्रंटलाईनला देण्यात आलेल्या लसीची माहिती संकलित करण्यात आली नाही, असे उत्तर देण्यात आले आहे.
ऑफलाईन दाखल होणाऱ्या नागरिकांना पन्नासच्या पन्नास टोकन देण्यात यावीत, असे तुषार शिर्के यांचे म्हणणे आहे. कुर्ल्यापुरता हा विषय मर्यादित नाही तर मुंबईत सर्वत्र अशीच अवस्था आहे. खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये अशीच अवस्था असून, नोडल अधिकाऱ्याने याबाबत योग्य कार्यवाही करावी. कारण नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळेच नेमण्यात आलेले स्वयंसेवक असोत किंवा नोडल अधिकारी यांनी टोकन वितरित करताना नागरिकांचे हाल होऊ नयेत, याकडे या समस्येच्या निमित्ताने लक्ष वेधले गेले आहे.