Corona Vaccination: पुरेशा लस साठ्याअभावी उद्या मुंबईत लसीकरण बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 11:33 PM2021-07-08T23:33:20+5:302021-07-08T23:33:41+5:30
पालिका आणि सरकारी केंद्रात लस नाही
मुंबई - केंद्राकडून अपेक्षित लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम पुन्हा थंडावली आहे. लसींचा साठा मर्यादित असल्याने गुरुवारी दिवसभरात केवळ ४५ हजार नागरिकांना लस मिळाली. सरकारी आणि पालिका केंद्रावर तर केवळ १५ हजार नागरिकांना दोस्त मिळू शकले. तर अनेकांना डोस न घेताच घरी परतावे लागले. दरम्यान, लसींचा साठा शिल्लक नसल्याने शुक्रवारी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० लोकांनी लस घेतली आहे. गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती मात्र या आठवड्यात केंद्राकडून मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. गुरुवारी काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.
गुरुवारी महानगरपालिकेच्या २८३ केंद्रांवर जेमतेम १४ हजार लोकांना लस देण्यात आली. तर खासगी लसीकरण केंद्रांमध्ये २८ हजार लोकांना लस देण्यात आली. सरकारच्या २० केंद्रांमध्ये १६०० लोकांना लस देण्यात आली. म्हणजेच एकूण ४५ हजार लोकांना लस देण्यात आली. मात्र पुढील दोन दिवस लस येण्याची शक्यताही कमी आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हाच लसीकरण मोहीम सुरू होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आरोग्य सेवक - ३१८२७९
फ्रन्टलाइन वर्कर्स - ३७७६७२
ज्येष्ठ नागरिक - १४७१३१०
४५ ते ५९ वर्षे - १७३९६७४
१८ ते ४४ वर्षे - २००९८३०
लसीकरण केंद्रावरील आकडेवारी
(कोविशिल्ड)
महापालिका - २९ लाख ६९ हजार ६०
सरकारी : तीन लाख १० हजार १८७
खासगी : २२ लाख ७२ हजार ७९३
कोव्हॅक्सिन
महापालिका - एक लाख ३८ हजार ८४०
सरकारी - ४९ हजार ३८४
खासगी - एक लाख ८५ हजार ६२४
स्पुतनिक- ३६६२