मुंबई - लसींचा मर्यादित साठा येत असल्याने आपल्याला लस मिळेल का? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. ही गर्दी थोपविणे काहीवेळा महापालिकेच्या हाताबाहेर जात असल्याने यापुढे केवळ कोविन ॲपवर नोंदणी झालेली व संबंधित केंद्रावर लस घेण्याची वेळ दिलेल्या नागरिकांचेच लसीकरण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गुरुवारी दिले आहेत.
मुंबईत १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र लस मिळणार नाही या भीतीने अनेक केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे आता केवळ 'कोवीन ॲप' किंवा 'कोविन पोर्टल' यावर यशस्वीरित्या नोंदणी झाल्यावर 'अपॉइंटमेंट स्लॉट' मिळालेल्या व्यक्तींचेच लसीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सर्व लसीकरण केंद्रांवर संबंधित बाबींची पडताळणी केल्यानंतरच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश द्यावा, असे आदेश आयुक्तांनी संबंधितांना गुरुवारी दिले.
यांनाच मिळेल लसीकरण केंद्रात थेट प्रवेश....मुंबईत महापालिका, राज्य सरकारने आणि खासगी रुग्णालयात असे मिळून १४७ लसीकरण केंद्रे आहेत. ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसींचा दुसरा डोस घेण्यासाठी पहिल्या लसीकरणाचे प्रमाणपत्र हे 'हार्ड कॉपी' किंवा 'सॉफ्ट कॉपी' सादर केल्यानंतर लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापकांनी पडताळणी करून प्रवेश द्यावा.
आरोग्य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी हे कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आल्यास त्यांच्या नियोक्त्याने अधिकृतपणे प्रमाणित केलेल्या पत्राची पडताळणी केल्यानंतरच लसीकरण केंद्रात प्रवेश देण्यात येईल.