कोरोना लसीकरण हा तर आमचा हक्कच! वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही होकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 09:42 AM2020-12-11T09:42:39+5:302020-12-11T09:48:10+5:30
Corona vaccination : देशभरात आता राज्यासह मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, फ्रंटलाइनमध्ये काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
देशभरात आता राज्यासह मुंबईत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, फ्रंटलाइनमध्ये काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील शेवटच्या घटकातील औषध विक्रेते, स्मशानभूमीतील कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक यांनीही लसीकरण हा आमचाही हक्क असल्याचे मत मांडले आहे, त्यामुळे प्राधान्याने देण्यात येणाऱ्या लसीकरणासाठी आमचाही विचार व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे... लसीकरणाविषयी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा घेतलेला हा आढावा...
मी वैयक्तिक पातळीवर लस घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे सुरक्षाकवच मिळून रुग्णांना यथायोग्य सेवा देता येईल. त्यासाठी संशोधन, निदान, अचूकता, उपयुक्तता या सर्व पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली आहे. याचा विचार करून आरोग्य यंत्रणांनी या लसीच्या व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा.
- डॉ. सुमती शहा,
खासगी वैद्यकीय तज्ज्ञ
कोरोनाच्या सुरुवातीच्या संक्रमणापासून या लढ्यात औषध विक्रेत्यांचीही भूमिका महत्त्वाची राहिली आहे. आमच्या योगदानाचा विचार करून यंत्रणांनी लसीकरणासाठी औषध विक्रेत्यांचाही विचार करावा.
- अनिकेत चव्हाण,
औषधविक्रेता, भांडुप
लसीच्या किमतीचा प्रश्नदेखील स्वाभाविक आहे, केंद्र यासंदर्भात राज्यांशी बोलत आहे. सार्वजनिक आरोग्यास प्राधान्य देण्यात यावे. आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह आरोग्य चळवळीतील अधिकृत कार्यकर्त्यांचा विचार व्हावा.
- श्रेया माणिक,
आरोग्य चळवळीतील कार्यकर्त्या
लसीकरण मोहिमेची लवकर अंमलबजावणी करण्यासाठी वेगवान नियामक मंजुरी आणि वेळेवर खरेदीसाठी कालबद्ध योजना तयार करावी. लस घेण्यासाठी सकारात्मकता आहे, त्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा विचार आधी केल्याने त्याचा आनंदही आहे. परंतु, लसीच्या उपयुक्ततेविषयी साशंकता आहे.
- डॉ. प्रदीप खोत, मधुमेहतज्ज्ञ
सुरुवातीच्या टप्प्यात लस मिळतेय, त्याचा आनंद असून आता याचे परीक्षण डॉक्टर म्हणून करण्याची संधी मिळेल याचेही समाधान आहे. प्राधान्यक्रमाच्या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक ठिकाणापर्यंत ही लस पोहोचेल, हे सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक पावले टाकली जात आहेत.
- डॉ. अभिज्ञा शहा, श्वसनविकारतज्ज्ञ
लसीकरणासाठी परिचारिकांचा विचार केला त्याचा अत्यंत आनंद आहे, लस घेण्यासाठी उत्सुक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची अन्य मार्गदर्शक तत्त्वेही पाळायला हवीत, जेणेकरून आपल्यासह समाजही सुरक्षित राहील. आणि लवकरच आपल्याला या विषाणूशी लढण्याचा सशक्त मार्ग सापडेल.
- रोहिणी घोंगे, वरिष्ठ परिचारिका
लसीकरणाच्या प्रक्रियेत सुरुवातीला येणारे घटक आरोग्य कर्मचारी आहेत, ही समाधानकारक बाब आहे. लसीकरण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच या क्षेत्रातील सर्व व्यक्तींच्या विम्याची योग्य तरतूद असणे महत्त्वाचे आहे. विमाविषयक उपाययोजनांसाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे.
- डॉ. रक्षा
देशमाने, मेंदूविकारतज्ज्ञ
अन्य घटकांसह आमचाही लसीकरण प्रक्रियेकरिता प्राधान्यक्रमाने विचार करण्यात यावा. आम्हालाही लस देण्यात यावी, कारण रुग्णवाहिका चालकांनीही महत्त्वाचे योगदान या लढ्यात दिले आहे.
- परेश मयेकर, रुग्णवाहिका चालक
कोरोना प्रतिबंधक लसीकरिता सर्व स्तरांतून मागणी आहे. त्यामुळे या घटकांचा विचार करतानाही यंत्रणांनी विविध गट करावेत, त्यात मग अतिजोखमीचे आजार, लहान मुले, गर्भवती अशा स्वरूपात विचार करता येईल. जेणेकरून, लसीची उपलब्धता आणि उपयुक्ततेचे परीक्षण करणेही सोपे जाईल.
- सुचिता म्हात्रे, परिचारिका
संक्रमण काळात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र आता लसीकरण करताना या घटकाचा यंत्रणांनी विचार केला नाही. महत्त्वाचे योगदान देऊनही हा घटक वंचित राहिला आहे. त्यामुळे लसीकरण्यासाठी आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचाही विचार केला पाहिजे, लसीकरण हा आमचाही हक्क आहे.
- राजेंद्र येंदे, स्मशानभूमीतील कर्मचारी
कोरोनाची लस घेण्यासाठी मी अजिबात उत्सुक नाही. ही लस नेमकी किती प्रभावी आहे याबाबत सरकारकडे नेमकी आकडेवारी नाही. मुंबईसारख्या शहरात अर्ध्याहून अधिक लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. त्यामुळे ही लस किती उपयुक्त आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.
- चेतन कंठपुरे,
रुग्णवाहिका चालक, शिवडी
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस देण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. लस घेण्याबाबत उत्सुकता असून यामुळे ते अन्य रुग्णांवर योग्यरीतीने उपचार करू शकतील. अनेक जणांना कोरोना होऊनसुद्धा त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदादेखील कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे सर्वांनीच कोरोनाची लस घ्यायला हवी.
- डॉ. अमित घरत, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट
वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत हायरिस्कवर असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस द्यावी. मी स्वतः ही लस घेण्यासाठी उत्सुक आहे.
- डॉ. आरिफ खान,
खासगी डॉक्टर, गोवंडी
पुन्हा एकदा लॉकडाऊन आपल्या देशाला परवडणारा नाही. यामुळे शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून लस घ्यावी लागेल.
- मनोज सणस,
रुग्णवाहिका चालक, कलिना
सरकार वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. डॉक्टरांप्रमाणेच हळूहळू सामान्य नागरिकांनादेखील ही लस देण्यात येणार आहे. या लसीमुळे किती प्रमाणात अँटिबॉडी तयार होतील याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे लस घेण्याबाबत उत्सुकता नाही.
- पालिका रुग्णालय, वरिष्ठ डॉक्टर
मागील आठवड्यात लस घेऊनही एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. अशा स्थितीत लसीकरण प्रक्रियेच्या सुरुवातीसाठी घाई करू नये.
- अतुल शिरसाट,
क्ष-किरण विभागातील कर्मचारी
लसीच्या अचूक परीक्षणाकरिता सामायिक प्रोटोकॉल विकसित करण्यात साहाय्य, प्रशिक्षण, डेटा व्यवस्थापन प्रणाली, नियामक सादरीकरण, अंतर्गत आणि बाह्य गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली या सगळ्याचा विचार केला पाहिजे.
- प्रद्युक्त पोयरेकर, रेडिओलॅजिस्ट
कोरोनाची लस आल्यानंतर ती आम्हा डॉक्टरांना आधी मिळाल्यास काम करण्यास अधिक सोयीस्कर जाईल. कोरोना लसीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर ती आरोग्य सेवेत काम करणाऱ्यांना कशा प्रकारे देण्यात येईल, याबद्ण वॉचच्या भूमिकेत आहोत.
- डॉ. राहुल वाघ,
अध्यक्ष, सेंट्रल मार्ड, महाराष्ट्र
जे ज्येष्ठ नागरिक हायरिस्कवर आहेत अशांना ही लस प्राधान्याने देण्यात यावी. ज्यांना कोरोनाची लागण झाली नव्हती अशांना सुरुवातीला लस देण्यात यावी.
- डॉ. समीर महाडिक,
खासगी डॉक्टर, चेंबूर
आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींना ही लस दिल्यास त्यांचे मानसिक स्वास्थ्यदेखील चांगले राहील. यासोबत सामान्य नागरिकांनी मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व सामाजिक अंतर राखणे या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.
- डॉ. शिल्पा देशमुख,
वरिष्ठ संचालक, शुश्रूषा रुग्णालय
डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, फार्मसी यांना सर्वांत आधी लस दिली पाहिजे. कोरोनाची लस दिल्यानंतर आपल्याला कोरोना होणार नाही याची अनेकांना शाश्वती असेल.
- कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशन
कोरोनाच्या लसीसंदर्भात महानगरपालिका डॉक्टरांना सहकार्य करीत आहे. त्यासाठी आम्ही महानगरपालिकेकडे डॉक्टरांची यादीदेखील पाठविली आहे. लस आल्यानंतर ती डॉक्टरांना देण्यात येणार आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. आम्ही सर्व डॉक्टर लस घेण्यासाठी उत्सुक आहोत.
- डॉ. रणजीत माणकेश्वर,
अधिष्ठाता, जे. जे. रुग्णालय
ही लस हाच कोरोनावरील एकमेव उपाय असेल असे नाही. त्यामुळे लसीची उपयुक्तता तसेच लसीचे मानवी शरीरावर होणारे परिणाम याबद्दल स्पष्टता असायला हवी. डॉक्टरांमध्ये लस घेण्याबाबत उत्सुकता नाही.
- डॉ. संदीप यादव, अध्यक्ष,
राज्य पॅथॉलॉजिस्ट असोसिएशन
मला सुरुवातीच्या काळातच कोरोनाची लागण झाली होती. मी कोरोनाची लस घेण्यासाठी उत्सुक आहे. माझ्या कुटुंबीयांनादेखील माझ्यासोबतच लस मिळायला हवी. लस दिल्यानंतर रुग्णांची सेवा करण्याकरिता हुरूप येईल.
- मयूरेश सरतापे,
रुग्णवाहिका चालक, मानखुर्द
नागरिकांनी ही लस आवर्जून घ्यावी, परंतु निदान पुढील वर्षभर मास्क वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी पाळायला हव्यात.
- डॉ. हेमंत मोहिते,
बीएचएमएस, डॉक्टर