Corona vaccination: लोकप्रतिनिधींना हवी कोविशिल्ड लस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 12:18 PM2021-02-19T12:18:47+5:302021-02-19T12:19:46+5:30
Mumbai Corona vaccination Update : मुंबईत टप्प्याटप्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगर पालिकेतर्फे कोविड लसीकरण मोहिम मुबंईत विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मार्चपासून मुंबईतील सर्व खासदार, आमदार,नगरसेवक आदी लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे.आज पर्यंत अनेक मंत्री, लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाली असून उपचारा नंतर ते कोरोना मुक्त झाले आहेत.
आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले असून काल आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार रक्षा खडसे,माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत टप्प्याटप्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगर पालिकेतर्फे कोविड लसीकरण मोहिम मुबंईत विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे.
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून काल 736 मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली आहे. एकीकडे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त,सहाय्यक आयुक्त,डॉक्टर, नर्स ते थेट सफाई कर्मचारी आदी फ्रंट लाईन पैकी अनेकांनी लस घेतली आहे.
मात्र आपला जीव धोक्यात घालून आपल्या भागातील कोरोना मुक्तीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या,वेळ प्रसंगी पालिका मुख्यालयात बैठका, सभांना सहभागी होणाऱ्या आणि नागरिकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना लस देण्याचे पालिकेचे धोरणच नाही. त्यामुळे पालिकेने सदर प्रकरणी धोरणात्मक लवकर निर्णय घेऊन मुंबईतील सर्व लोकप्रतिनधींनी कोविशिल्ड लस लवकर द्यावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 च्या जेष्ठ नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी एका पत्राद्वारे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली असून त्यांनी सदर पत्राची प्रत पालिका आयुक्तांना सुद्धा दिली आहे. महापौरांशी आपण संपर्क साधून आपली भूमिका त्यांना विषद केल्याचे नगरसेविका म्हात्रे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींना लस दिल्यास नागरिकांच्या मनातली लसीकरणाची भीती कमी होईल आणि अनेक नागरिक लस घेण्यासाठी पुढे येतील असे मत शीतल म्हात्रे यांनी लोकमतकडे व्यक्त केले. याप्रकरणी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भूमिका समजू शकली नाही.