लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत १६ जानेवारीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी राज्यासह जिल्हा, तालुका स्तरावर लसींचा साठाही दाखल झाला आहे. कोरोनाच्या लसीकरण प्रक्रियेमुळे केंद्र शासनाने पोलिओ लसीकरण मोहिमेचा नियोजित उपक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहर, उपनगरातील पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
१७ जानेवारीपासून पोलिओ मोहीम सुरू होते, मात्र यंदा पुढे ढकलण्यात आली आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होईल. ज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश प्राधान्याने आणि पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. पोलिओ लसीकरण लांबल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण, याच कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरण दिले जाणार आहे. पोलिओ लसीकरण पुढे ढकलले असल्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आले आहे.
राज्यभरात कोरोना लसीकरणामुळे पोलिओ लसीकरणाची मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र यामुळे बालकांना कोणताही धोका नाही. मागील वर्षभरात लॅकडाऊनमुळे बरीचशी कुटुंबे बाहेरगावी गेल्याने ज्या बालकांना डोस द्यायचे राहिलेत अशा बालकांना यात समाविष्ट करून घेण्यात येणार होते, त्यामुळे ज्या वेळी उपक्रम निश्चित करण्यात येईल त्या वेळी उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.