Join us

मुंबईत वाढणार लसीकरणाचा वेग; ज्येष्ठांनाही कोरोनाची लस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 5:03 AM

४६ खासगी रुग्णालयांचीही घेणार मदत

मुंबई : कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी मुंबई महापालिका युद्धपातळीवर काम करत असून, येथे सुरु झालेल्या लसीकरणानेही वेग पकडला आहे. मात्र मुंबई महापालिका एवढ्यावर थांबणार नसून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या प्रत्येकास लस देतानाच आता ज्येष्ठ नागरिकांनादेखील कोरोनाची लस युद्धपातळीवर उपलब्ध व्हावी म्हणून काम वेगाने काम करत आहेत, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. मुंबईत सुरू असलेला लसीकरणाचा वेग असाच  कायम राहणार असून, १५ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून, यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे.कोरोनाचा शिरकाव जेव्हा मुंबईत झाला तेव्हा वेगाने कोरोना मुंबईकरांमध्ये पसरला. मात्र मुंबई महापालिकेने धारावी, वरळीसह मालाड आणि इतर परिसरात केलेल्या उल्लेखनीय कार्यवाहीमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले. विशेषत: आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी विविध स्तरावर विविध उपाययोजना हाती घेतल्या. यात नियंत्रण कक्षासह कोविड  सेंटर, चाचण्या, रुग्णालयतील वाढत्या सेवा सुविधा, सर्वेक्षण, गर्दीवरील बंधने, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीदरम्यान घालण्यात आलेली बंधने; अशा सर्वच कार्यवाहीमुळे कोरोना नियंत्रित होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.आता मुंबईत कोरोना लसीकरण वेगाने सुरु असून, फ्रंटलाईन वर्कनंतर लसीकरणाचे उर्वरित टप्पेदेखील हाती घेतले जाणार आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याने आता ज्येष्ठ नागरिकांना १५ मार्चच्या आसपास लसीकरण केले जाईल. राज्य सरकार यासाठी काम करत असून, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राने यात सहभागी होत कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलण्यात आला आहे. एकट्या मुंबईत ४६ खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाईल. दरम्यान, ५० वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे ३० लाखांवर आहे. तर दुसरीकडे येथील १ कोटी लोकसंख्येपैकी ३ लाख नागरिक १५ मार्चपर्यंत यासाठी पात्र ठरणार आहेत.

टॅग्स :कोरोनाची लस