मुंबई - सध्या मुंबईत लसीचा साठा कमी असून अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागत आहे. आपला नंबर लवकर लागावा यासाठी अनेक जण ओळख काढतात. तर अनेक जण गर्दी टाळण्यासाठी खासगी लसीकरण केंद्रात लस घेतात. तर राजकीय पक्षांच्या आमदार,नगरसेवक यांना तर सहज लस मिळणे शक्य असते.
मात्र याला छेद देत आज बोरिवली पश्चिम येथील भगवती हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे विधान परिषदचे पदवीधर मतदार संघाचे आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस यांनी चक्क सकाळी सुमारे दीड तास रांगेत उभे राहून लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी सकाळी 8.30 वाजता लसीकरणा साठी रांग लावली आणि 10 वाजता त्यांना लस मिळाली.
१८ वर्षावरील लोकांना महाराष्ट्रात १ मे पासून लसीकरण नाही
१८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र या वयोगटाला १ मे पासून कोरोना लस मिळणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिली आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना १ मेपासून कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ठाकरे सरकारनं या वयोगटाला मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र सध्याच्या घडीला राज्याकडे कोरोना लसींचा पुरेसा साठा नसल्यानं १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरू करण्यास आरोग्यमंत्री टोपेंनी असमर्थता दर्शवली. देशात सध्या दोनच लसी उपलब्ध असल्यानं पर्याय उपलब्ध नाहीत. त्यातच लसींची निर्मिती करणाऱ्या दोन कंपन्यांकडे असलेला ५० टक्के साठा केंद्र खरेदी करणार आहे. तर उर्वरित ५० टक्के साठा राज्यं सरकार, खासगी कंपन्या, खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. त्यामुळे राज्यं सरकारांवर मर्यादा येत असल्याची माहिती टोपेंनी दिली.
टप्पे आखले जाणार?
१८ ते ४५ वर्षे वयोगटाचं लसीकरण करण्यासाठी लवकरच संपूर्ण नियोजन केलं जाईल. यासाठी १८ ते २५, २५ ते ३५ आणि ३५ ते ४४ असे तीन गट करण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय दुर्धर आजार असलेल्यांना लसीकरणात प्राधान्य द्यायचं का याबद्दलही विचार सुरू आहे. नागरिकांनी कोविन ऍपवर नोंदणी करून आणि अपॉईंटमेंट घेऊनच लस घेण्यासाठी केंद्रावर यावं. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असं आवाहनही टोपेंनी केलं.