- मनोहर कुंभेजकर मुंबई - सध्या लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू आहे. तर एकीकडे लसींचा साठा कमी असून दुसरीकडे अनेक ठिकाणी पहाटे पासून लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये आणि लवकर लस मिळावी यासाठी तरुणाई पासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांची धडपड सुरू आहे. ज्येष्ठांची लसीकरणाची वेगळी अशी रांग आणि व्यवस्था नसल्याने आपल्याला लस कशी आणि केव्हा मिळणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.
गोरेगाव पश्चिम बांगुर नगर येथे पुण्याच्या डॉ.पल्लवी लोकेगावकर यांचे वयोवृद्ध आई व वडील राहतात.वडिलांचे वय 81 तर आईचे वय 75 असून आईला अजिबात दिसत नाही. पुण्याहून मुंबईत येऊन लसीकरण करण्यासाठी रांगेत उभ राहून टोकन मिळवणे ,लस घेऊन झाल्यावर मुंबईत १५ दिवस विलगीकरण,नंतर १५ दिवस.पुण्यात विलगीकरण हे विचार त्यानं अस्वस्थ करत होता. मग लसीकरणाचा दुसरा डोस आपल्या आई वडिलांना कसा मिळणार या विवंचनेत त्या होत्या.
स्वतः त्या पुण्यात कल्याणी नगर येथे राहात असल्याने आणि लॉकडाऊन मुळे सध्या मुंबईत येणे शक्य नव्हते.मग आई वडिलांचे लसीकरण करण्यासाठी त्यांनी अखेर गोरंगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांच्याशी संपर्क साधला. चितळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी व भाजपाचे प्रभाग क्रमांक 58 चे स्थानिक नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांनी वयोवृद्ध आई वडिलांना श्रावण बाळा प्रमाणे मोलाची मदत केली. आई वडिलांना गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर लसीकरण केंद्रावर काल दुपारी 3.45 च्या सुमारास राजन सावे यांनी बांगूर नगरला जाऊन आईवडिलांना घेऊन मोतीलाल नगर येथील लसीकरण केंद्रावर पोहचले. तिथे लसिकरण नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पाडली. तो पर्यंत उदय चितळे व प्रितम सावे हे जातीने हजर होते.
भाजपाचे प्रभाग क्रमांक 58 चे स्थानिक नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांनी वयोवृद्ध आई वडिलांना मदत करत त्यांचे लसीकरण केले.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या गाडीने आई वडिलांना घरी सुखरूप पोहचवले. आणि स्वतः ते मित्राच्या बाईक मागे बसून गेले अशी माहिती डॉ.लोकेगावकर यांनी खास पुण्यावरून लोकमतला दिली.
जेष्ठ नागरिक विशेष करून व्योवृद्धांसाठी लसीकरणाची वेगळी व्यवस्था असावी,त्यांना जास्त वेळ रांगेत उभे न करता लसीकरण सुलभ व लवकर होण्यासाठी मदतनीस देण्यात यावा अशी यंत्रणा राज्यात व मुंबईत असली पाहिजे असे मत डॉ.पल्लवी लोकेगावकर यांनी व्यक्त केले.
सध्याच्या कलीयुगात माणुसकी हरवली असे आपण म्हणतो ते खोट ठरवणारा हा अनुभव आपल्याला आला आणि वयोवृद्ध आई वडिलांच्या मदतीला धावून येणाऱ्या गोरेगाव प्रवासी नागरिक संघ व नगरसेवक संदिप पटेल यांचे त्यांनी आभार मानले.