मुंबई - तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लसीकरण मोहीम गेले तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र मंगळवार व बुधवार या दोन्ही दिवशी कोविशिल्डच्या पहिल्या डोससाठी ६० वर्षांवरील लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार आहे. मात्र चक्रीवादळामुळे प्रभावित झालेली काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत २८ लाख ४१ हजार ३४९ लोकांनी लस घेतली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे असून ११ लाख ३३ हजार ६२८ ज्येष्ठांनी लस घेतली आहे. लसचा साठा मर्यादित स्वरूपात येत असल्याने केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने ऑनलाईन नोंदणी बंधनकारक केली. मात्र ऑनलाईन वेळ मिळण्यास अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने १७ ते १९ हे तीन दिवस केंद्रावर थेट लस घेण्याची सुविधा उपलब्ध केली होती.
मात्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शनिवार ते सोमवार लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली. महापालिकेकडे सध्या पुढील दोन दिवस चालेल, एवढ्या लसींचा साठा आहे. त्यामुळे १८ आणि १९ मे हे दोन दिवस लस दिली जाणार आहे. मात्र काही केंद्रे बंद ठेवण्यात येणार असल्याने कोणत्या केंद्रांवर लस मिळेल, याची यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
यांनाच मिळणार लस...
केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर किमान १२ ते १६ आठवडे (किमान ८४ दिवस) पूर्ण केलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील नागरिक २४ मे २०२१ नंतर दुसऱ्या डोससाठी पात्र असतील. तर १८ आणि १९ मे या दोन्ही दिवशी कोविशिल्डच्या पहिल्या डोससाठी ६० वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस घेऊ शकतात.
लसीकरण...आतापर्यंत
आरोग्य सेवक - २९८७६२
फ्रंट लाईन वर्कर्स - ३५६०९८
ज्येष्ठ नागरिक - ११३३६२८
४५ वर्षांवरील - १००४१११
१८ ते ४४ वर्षे....४८७५०
एकूण २८४१३४९