Corona Vaccination: आजचा दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; माेहीम थंडावण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 04:41 AM2021-04-09T04:41:33+5:302021-04-09T07:22:11+5:30

२५ केंद्रांवर साठा संपला

Corona Vaccination: Stocks of vaccines only enough for today | Corona Vaccination: आजचा दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; माेहीम थंडावण्याची भीती

Corona Vaccination: आजचा दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा; माेहीम थंडावण्याची भीती

Next

मुंबई : कोविड - १९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी मान्यता मिळालेल्या ७१ पैकी २५ खासगी रुग्णालयात लस साठा संपला आहे. त्यामुळे या केंद्रांवर गुरुवारी लसीकरण होऊ शकले नाही. तर उर्वरित केंद्रांवर दिवसभर लसीकरण सुरू होते. मात्र हा साठाही शुक्रवारी पुरेल इतकाच असल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम थंडाविण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक, दुसऱ्या टप्प्यात फ्रन्टलाइन वर्कर्स, तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले व्यक्ती, तर आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. आतापर्यंत १५ लाख ६१,४२० लस वापरल्या. रोज सरासरी ४० ते ४५ हजार लसी दिल्या.

दररोज एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. यासाठी दर आठवड्याला किमान दहा लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे वेळोवेळी केली आहे. मोठ्या प्रमाणात लसींचा साठा करण्यासाठी कांजूरमार्ग येथील साठवण केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. मात्र लसींचा साठा मर्यादित असल्याने पालिकेची मोठी पंचाईत झाली आहे.

दिवसभर गोंधळ; नागरिकांची निराशा
महापालिका आणि राज्य सरकार यांच्यामार्फत ४९ तर ७१ खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवर प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. बुधवारपर्यंत मुंबईकडे केवळ एक लाख ४८ हजार १३० इतका लसींचा साठा शिल्लक होता. त्यामुळे गुरुवारी २५ केंद्रावर लसीकरण बंद करण्यात आले. तर काही ठिकाणी नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

लसींचा साठा मिळविण्यासाठी धावपळ
मुंबईत ७ एप्रिलपर्यंत १७ लाख नऊ हजार ५५० लसी मिळाल्या आहेत. यापैकी १५ लाख ६१ हजार ४२० लस उपयोगात आल्या. शिल्लक एक लाख ४८ हजार १३० साठ्यातील ४४,८१० लस दुसऱ्या डोससाठी शासनाच्या निर्देशानुसार राखीव आहेत. गुरुवारी सकाळी एक लाख तीन हजार ३२० लसी उपलब्ध होत्या. दिवसभरात सरासरी ४० ते ५० हजार लोकांचे लसीकरण झाले. तर शुक्रवारसाठी केवळ ५० ते ६० हजार लस शिल्लक आहेत. त्यामुळे लसींचा साठा मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

Web Title: Corona Vaccination: Stocks of vaccines only enough for today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.