corona vaccination : लसीकरण केंद्रांवर लस निवडण्याचा पर्याय नाही, जी मिळेल ती घ्या, मुंबई मनपा आयुक्तांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 07:33 PM2021-03-19T19:33:29+5:302021-03-19T19:33:48+5:30
corona vaccination in Mumbai : दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्या, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.
मुंबई - लसीकरण सुरू झाल्यानंतर मुंबईत कोविशिल्ड ही लस देण्यास महापालिकेने सुरुवात केली. मात्र सोमवारपासून भारत बायोटेक कंपनी निर्मित ‘को-व्हॅक्सीन’ ही दुसरी लस उपलब्ध करण्यात आली आहे. ही लस अधिक प्रभावी असल्याचा समज करुन लोकांकडून हीच लस देण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर आपल्याला लस निवडण्याचा पर्याय उपलब्ध नाही. दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल त्याचा लाभ घ्या, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे. (There is no option to select vaccines at vaccination centers, take whatever you can get, appeals Mumbai Municipal Commissioner)
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून ‘कोविड - १९’ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडीया’ या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करुन देण्यात आली. तर १५ मार्चपासून ‘भारत बायोटेक’ या कंपनी निर्मित ‘को-व्हॅक्सीन’ ही लस वापरण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. या व्यतिरिक्त इतर काही वेगळ्या लसीदेखील भविष्यात उपलब्ध होणार आहेत. मात्र नवीन लस बाजारात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम वाढले आहे. अनेक ठिकाणी केंद्रावर नागरिक कोविशिल्डची मागणी करीत असल्याने लस देण्यास विलंब होत आहे.
सध्या दोन्ही प्रकारच्या लस मुंबईसह देशात वापरण्यात येत असून दोन्ही लसी परिणामकारक आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावर दोन्ही लसींबाबत संभ्रम न बाळगता लसीकरण केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती घ्या, असे आवाहन आयुक्तांनी शुक्रवारी केले. तसेच लस घेतल्यानंतरही सर्वच नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी संबंधित नियमांचे पालन करावे. यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे किंवा वारंवार हात धुणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
विलगीकरण आवश्यक
कोविड - १९ या संसर्गजन्य आजारावर खात्रीशीर औषध नसल्यामुळे कोरोना झालेल्या व्यक्ती किंवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांचे विलगीकरण अलगीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करा, अशी सूचना पालिकेने केली आहे.