मुंबई : तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार आहे. यामुळे सध्या देशात लहान मुलांच्या लसीकरणाची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात लसीकरणाची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे; मात्र ५० मुलांची गरज असताना अवघ्या पाच मुलांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कारण मुंबईत लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी लहान मुलेच मिळत नसल्याने अडथळा निर्माण होत आहे.पालिकेच्या नायर रुग्णालयात १३ जुलैपासून १२-१७ वयोगटातील लहान मुलांची लसीकरण क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. जायडस कॅडिलाची झायकोव्ह- डी ही लस मुलांना देण्यात येत आहे. यासाठी ५० मुलांची गरज आहे; पण आतापर्यंत फक्त पाच मुलांनी नाव नोंदणी केली असून, लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुलांनी लसीचे तीन डोस चार आठवड्याच्या अंतराने घ्यायचे आहेत. अहमदाबाद येथील फार्मा कंपनी जायडस कॅडिलाची जायकोव-डी पी पहिली डीएनए आधारित लस आहे. कोव्हॅक्सिननंतर ही दुसरी स्वदेशी लस आहे. नायर रुग्णालय हे मुंबईतील पहिले रुग्णालय आहे जिथे मुलांवरील लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.लसीच्या प्रोटोकॉलनुसार चाचणीसाठी मुलांच्या आई-वडिलांची लेखी परवानगी व व्हिडिओतून दिलेली परवानगी आवश्यक आहे. पण कोरोना लसीकरणाबाबत अपेक्षित प्रमाणात जनजागृती नसल्याने अशी स्थिती ओढावल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.
दोन हेल्पलाईन सज्जया लसीकरण ट्रायलमध्ये जास्तीत जास्त लहान मुलांनी सहभाग घ्यावा, यासाठी रुग्णालयाने दोन हेल्पलाइनही दिल्या आहेत. ०२२-२३०२७२०५, २३०२७२०४ जे पालक आपल्या मुलांना या ट्रायलमध्ये पाठवू इच्छितात त्यांनी वरील क्रमांकावर संपर्क करावा व आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.