मुंबई : राज्य सरकारने शनिवार, रविवार दोन दिवस लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळातही शनिवार दुपारी १२ ते सायं. ६ आणि रविवार सकाळी ९ ते ५ या वेळेत पालिकेच्या व शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात दि. १०, ११ आणि १२ एप्रिल या तीन दिवशी लसीकरण होणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.पालिका आणि राज्य शासनाचे मुंबईत ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रं आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. परंतु लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने शुक्रवारी खासगी रुग्णालयातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. तसेच पुढील तीन दिवसही या केंद्रामध्ये लसीकरण बंद राहणार आहे. मात्र लसींचा काही साठा मुंबईला शुक्रवारी रात्री उशिरा मिळणार होता. अधिक प्रमाणात लससाठा उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु हाेईल, असे प्रशासनाने सांगितले....या वेळेत हाेणार लसीकरण!पालिका आणि राज्य शासनाच्या लसीकरण केंद्रांमध्ये शनिवारी दुपारी १२ ते सायं. ६ या वेळेत पहिले सत्र होईल. तर नियमित दोन सत्रांचे नियोजन होत असलेल्या लसीकरण केंद्रांत दुसरे सत्र रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील . यामध्ये केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय, माहीम प्रसूतिगृह आणि बीकेसी जम्बो कोविड सेंटर या लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. तर रविवारी सकाळी ९ ते ५ वेळेत सुरू राहतील.
Corona Vaccination: लॉकडाऊनमध्येही दोन्ही दिवस सरकारी, महापालिकेच्या केंद्रांत लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 2:34 AM