मुंबई - कोविड प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. सरकारी आणि पालिका केंद्रांवर शनिवारी देखील लसीकरण होणार नाही, असेेेे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Corona vaccination in Mumbai) दरम्यान, शनिवारी ८५ हजार लसींचा साठा मुंबईला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम पुन्हा सुरू होईल शकेल. (Vaccination closed for second day in a row in Mumbai, no vaccine on Saturday in municipal, government centers)
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख लोकांनी लस घेतली आहे. गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती मात्र या आठवड्यात केंद्राकडून मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. गुरुवारी काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.
मात्र लसींचा साठा संपुष्टात आल्यामुळे शुक्रवारी पालिका आणि सरकारी केंद्रातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. शुक्रवारी लसींचा साठा मिळेल, अशी अपेक्षा महापालिकेला होती. मात्र केंद्रातून आता शनिवारी दुपारपर्यंत ८५ हजार लसींचा साठा येणार आहे. तर रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी केंद्रे बंद ठेवण्यात येत असल्याने लसीकरण मोहीम सोमवारीच पूर्ववत होईल.