Corona vaccination : मुंबईत आजपासून दोन पाळ्यांत लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:00+5:302021-04-01T04:10:45+5:30
Corona vaccination in Mumbai Update : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत तीन टप्प्यांतील ४० लाख लसीकरणाचे उद्दिष्ट्य गाठण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत तीन टप्प्यांतील ४० लाख लसीकरणाचे उद्दिष्ट्य गाठण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. त्यानुसार गुरुवारपासून मुंबईत दोन पाळीत म्हणजे सकाळी ७ ते दु. २ आणि दु. २ ते रात्री ९ या वेळेत पालिकेच्या १० केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे.
फेब्रुवारीपासून मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला. त्यामुळे लसीकरण वेगाने करून कोरोनाचा प्रसार रोखण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत ११ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचारी, दुसर्या टप्प्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि तिसर्या टप्प्यातील ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असणारे आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
२४ तास सेवा
सर्व व्यवस्था असलेल्या खासगी रुग्णालयांना २४ तास लसीकरणाची परवानगी पालिकेने दिली आहे. १० खासगी रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे.
पालिका आणि खासगी अशा १०८ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मुंबईत दिवसाला एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले आहे.
पालिकेकडे सध्या कोरोना लसीचे दीड लाख डोस आहेत. गुरुवारी आणखी सवादोन लाख डोस येणार आहेत. त्यामुळे लसीचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही, असा पालिकेचा दावा आहे.
४० लाख नागरिकांचे लसीकरण ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले आहे. सद्यस्थितीत सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत लसीकरण केले जात आहे.