Corona vaccination: मुंबईतील गर्भवती महिलांचे गुरुवारपासून लसीकरण, असे आहेत नियम, इथे मिळेल लस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:39 PM2021-07-14T19:39:11+5:302021-07-14T19:39:47+5:30
Corona vaccination In Mumbai: राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार केंद्राने गर्भवती महिलांनाही आता लसीकरणात समाविष्ट केले आहे.
मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीकरणात स्तनदा मातांना समाविष्ट केल्यानंतर आता गर्भवती महिलांनाही लस देण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत ३५९१ स्तनदा मातांना पहिला डोस घेतला आहे. तसेच महापालिकेच्या ३५ लसीकरण केंद्रांवर गुरुवारपासून लस देण्यास सुरुवात होणार आहे. ( Vaccination of pregnant women in Mumbai from Thursday)
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ६१ लाख ६८ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, १८ वर्षांवरील सर्व नागरिक, स्तनदा माता अशा सर्वांचे लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार केंद्राने गर्भवती महिलांनाही आता लसीकरणात समाविष्ट केले आहे.
यामुळेच गर्भवती महिलांचे लसीकरण.....
गर्भवती महिलांना तीव्र संसर्गाचा धोका असतो. गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूति होण्याचे प्रमाण अधिक आहे. दहा टक्के गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकार शक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग अशामुळे कोविड होण्याचे प्रमाण वाढते. या बाबींपासून गर्भवती महिल व होणा-या बाळाचा बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेणे फायदेशीर ठरु शकते.
गर्भवती महिलांसाठी नियम...
-गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत लस घेऊ शकतात. पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेने लस घ्यावी
-कोविड होऊन गेलेल्या गर्भवती महिलांना ‘मोनॉक्लोनल ऑंटीबोडीज’ प्लाजमा हा उपचार घेतलेला असल्यास १२ आठवड्यानंतर लस घ्यावी.
येथे मिळेल लस...
कामा रुग्णालय, नायर रूग्णालय, भायखळा - जगजीवनराम पश्चिम रेल्वे रूग्णालय, जे. जे. रूग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रूग्णालय, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा, सायन रुग्णालय, केईएम, एम. जी. एम. रुग्णालय, नायगाव प्रसूतिगृह, माहीम प्रसूतीगृह, ईएसआयएस रुग्णालय वरळी, देसाई रूग्णालय सांताक्रूझ (पूर्व), भाभा रूग्णालय, वांद्रे (पश्चिम), कुपर रूग्णालय, शिरोडकर प्रसूतिगृह, कुर्ला भाभा, माँ साहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, चुनाभट्टी, देवनार प्रसूतिगृह,मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह, राजावाडी रुग्णालय, आकुर्ली प्रसूतिगृह कांदिवली
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रूग्णालय, कांदिवली (पश्चिम)इ. एस. आय. एस. रूग्णालय, कांदिवली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रूग्णालय, मुलुंड (पूर्व)