Join us

Corona Vaccination: मुंबईत लसीचा लॉकडाऊन! शुक्रवारी दुपारनंतर एकूण ९० केंद्रे बंद; नागरिकांमध्ये प्रचंड संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 2:20 AM

मुंबईसह राज्यभरात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असला तरीदेखील आता यात अडथळे येत आहेत. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून लसीकरणाच्या कार्यक्रमात अडथळा येत आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, संसर्ग थोपविण्यासाठी आणि प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच आता यांपैकी एक असलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला मात्र खीळ बसली आहे. लसीचा साठा कमी असल्याने किंवा यात अडचणी येत असल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरण केंद्रांवर शुक्रवारीदेखील लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला होता. मुळात येथे दाखल अनेक ज्येष्ठ नागरिकांसह उर्वरित नागरिकांना याचा मोठा फटका बसल्याने आणि त्यांना ताटकळत राहावे लागल्याने त्यांचा पारा चढल्याचे चित्र होते.  मुंबईसह राज्यभरात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू असला तरीदेखील आता यात अडथळे येत आहेत. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून लसीकरणाच्या कार्यक्रमात अडथळा येत आहे. गुरुवारी (दि. ८) मुंबईतील बहुतांश लसीकरण केंद्रे बंद होती. माहीम येथील लसीकरण केंद्रावर लसीचा साठा संपल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. शुक्रवारी यात आणखी भर पडली. वांद्रे-कुर्ला संकुल येथील लसीकरण केंद्रावरच गोंधळ उडाल्याने, थोडक्यात लसीकरण बंद पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गोरेगाव येथील नेस्कोवरदेखील हीच परिस्थिती असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मुळात आताचे लसीकरण हे ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वयाच्या वरील व्यक्तींसाठी होत आहे. मात्र सुरुवातीचे काही दिवस सोडले तर आता यातील अडचणीत आणखी भर पडली आहे.बीकेसी, चेंबूर, मुलुंड आणि गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये शुक्रवारी लसीकरणाचा तुटवडा जाणवला. इतर केंद्रांवरही गर्दी होती; तर काही ठिकाणी लस नसल्याने केंद्रे बंद ठेवण्यात आली होती.  लस संपल्यामुळे राजावाडी, सायन, बीकेसी, माहीम प्रसूतिगृह या केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ जानेवारी २०२१ पासून पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीचे कोविड १९ या साथरोगावरील लसीकरण सुरू झाले.त्यानंतर १ फेब्रुवारीपासून पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठीच्या लसीकरणास सुरुवात झाली.१ मार्च २०२१ पासून सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात वयाची ६० वर्षे पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक आणि वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्यासह सहव्याधी असलेले नागरिक यांच्या लसीकरणास प्रारंभ झाला.१०६ लसीकरण केंद्रे कार्यरत असून, यापैकी २८ महापालिकेच्या अखत्यारीतील आहेत.२८ लसीकरण केंद्रांवर एकूण १५५ लसीकरण बूथ कार्यरत आहेत.राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीतील १२ लसीकरण केंद्रे कार्यरत असून एकूण १८ लसीकरण बूथ कार्यरत आहेत.विविध खासगी रुग्णालयांमध्ये ६६ लसीकरण केंद्रे कार्यरत असून,  लसीकरणासाठी एकूण ७४ बूथ आहेत.सर्व १०६ लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येत होते. मात्र आता यात अडथळे येत आहेत.नागरिक हतबललस देण्यासाठी मान्यता मिळालेल्या ७१ पैकी २५ खासगी रुग्णालयांत लससाठा संपल्याने या २५ लसीकरण केंद्रांवर गुरुवारी लसीकरण झाले नाही. उर्वरित केंद्रांवर लसीकरण सुरू होते. तेथेही शुक्रवारी पुरेल इतका लससाठा शिल्लक होता. मात्र शुक्रवारी यात आणखी अडचण आली. महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे ४९ कोविड लसीकरण केंद्रे तसेच ७१ खासगी रुग्णालयांत कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. बुधवारी, ७ एप्रिलपर्यंत एकूण १७ लाख ०९ हजार ५५० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. पैकी १५ लाख ६१ हजार ४२० लस उपयोगात आल्या. १ लाख ४८ हजार १३० इतका लससाठा बुधवारी लसीकरणानंतर शिल्लक होता.शिल्लक साठ्यातील ४४ हजार ८१० इतक्या लस दुसऱ्या मात्रेसाठी राखीव होत्या. १ लाख ०३ हजार ३२० इतक्या लसी गुरुवारी सकाळी उपलब्ध होत्या.८ एप्रिलचे सुमारे ४० ते ५० हजार लसीकरण पूर्ण झाल्यानंतर ९ एप्रिल पुरेल इतका लससाठा उपलब्ध असेल, असा दावा केला गेला. मात्र तो फोल ठरला. लसीकरणाबाबत एक उल्लेखनीय बाब म्हणजे लसीकरण करण्यात आलेल्या एकूण व्यक्तींपैकी ४७.३६% संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. 

टॅग्स :कोरोनाची लस