Corona Vaccination: फायझर लसीच्या पुरवठादाराची माघार;जागतिक निविदेची मुदत मंगळवारी संपणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 05:59 AM2021-05-30T05:59:01+5:302021-05-30T05:59:01+5:30
मुदत संपण्यास अवघे दोन दिवस उरले असताना उर्वरित सात पुरवठादारांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही
मुंबई : लस खरेदीसाठी महापालिकेने मागविलेल्या जागतिक स्तरावरील निविदेला आठ संभाव्य पुरवठादारांनी प्रतिसाद दिला. या पुरवठादारांना आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी १ जूनपर्यंतची मुदत आहे. मात्र यापैकी फायझर लसीच्या पुरवठादाराने स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर मुदत संपण्यास अवघे दोन दिवस उरले असताना उर्वरित सात पुरवठादारांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत ३१ लाख लोकांनी लस घेतली आहे, तर १८ ते ४४ वयोगटातील ९० लाख लाभार्थी अद्याप लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेने केंद्राकडून येणाऱ्या लसीच्या पुरवठ्यावर अवलंबून न राहता स्वतः एक कोटी लस खरेदी करण्याची तयारी केली आहे. यासाठी १२ मे रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिरुची मागविण्यात आली. तर स्पर्धेतील पुरवठादारांना आवश्यक कागदपत्र सादर करण्यासाठी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण आठ पुरवठादार कंपन्यांपैकी सात पुरवठादारांनी ‘स्पुतनिक’ लसीच्या पुरवठ्याची तयारी दाखवली आहे.
युरोपातील रोमानिया देशातील ओटू ब्ल्यू एनर्जी एसआरएल या कंपनीने फायझर कंपनीची लस पुरविण्याची तयारी दाखवली होती. मात्र या पुरवठादाराने आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती पालिकेला ईमेलच्या माध्यमातून कळविली. उर्वरित सात कंपन्यांपैकी पाच कंपन्यांशी अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी ऑनलाईन चर्चा केली. या सातही पुरवठादारांना काही कागदपत्रेही सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अद्याप या कंपन्यांनी ही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.
एकाही कंपनीने अद्याप कागदपत्रे सादर केली नाहीत
युरोपातील रोमानिया देशातील ओटू ब्ल्यू एनर्जी एसआरएल या कंपनीने फायझर कंपनीची लस पुरविण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर अर्ज मागे घेतल्याची माहिती पालिकेला ईमेलद्वारे दिली.
उर्वरित सात कंपन्यांपैकी पाच कंपन्यांशी अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी ऑनलाईन चर्चा केली. मात्र यासाठीची आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत.