लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शनिवारी महिलांसाठी विशेष सत्र राबविले जाणार आहे. त्यानुसार महापालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत फक्त महिलांना लसीचा पहिला अथवा दुसरा डोस मिळणार आहे.
मुंबईत आतापर्यंत एक कोटी २८ लाख २५ हजार ३७३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुष लाभार्थ्यांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलांना लस घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालिका प्रशासनाने विशेष सत्र राबविण्यास सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत दोनवेळा महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. महिलांनीही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
पहिला वेळेस एक लाख २७ हजार महिलांना तर दुसऱ्या वेळेस एक लाख २६ हजार महिलांनी लस घेतली. यामुळे महापालिकेने पुन्हा विशेष सत्र आयोजित केले आहे. मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रावर महिलांना थेट जाऊन कोविड लस घेता येणार आहे. यामध्ये कोविड लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. मात्र शनिवारी ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.