Corona Vaccine: लवकरच १४ तास लसीकरण मोहीम; महापालिका अतिरिक्त आयुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 06:34 AM2021-03-28T06:34:31+5:302021-03-28T06:34:45+5:30

८ मार्च रोजी ६५ केंद्रांवर ४० हजार, ५०२ लोकांना लस देण्यात आली. मात्र, गेल्या सहा दिवसांच्या आकडेवारीनुसार, १०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांचे सरासरी लसीकरण हे जवळपास ४१ हजारांपर्यंत झाले

Corona Vaccine: A 14-hour vaccination campaign soon; Information of Municipal Additional Commissioner | Corona Vaccine: लवकरच १४ तास लसीकरण मोहीम; महापालिका अतिरिक्त आयुक्तांची माहिती

Corona Vaccine: लवकरच १४ तास लसीकरण मोहीम; महापालिका अतिरिक्त आयुक्तांची माहिती

Next

मुंबई :  वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली असून १०० पेक्षा जास्त केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मात्र, आता किमान ५ ते ६ लसीकरण केंद्रात १४ तास लसीकरण करण्यास पालिकेकडून परवानगी देण्यात येईल. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ असेल.

लसीकरण केंद्रावरील वेळ वाढवण्यासोबतच या केंद्रांवरील नागरिकांचा प्रतिसाद पाहून इतर केंद्रांमध्येही सुविधा वाढवू, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयासह आणखी पाच ते सहा रुग्णालयात येत्या मंगळवारपासून १४ तास लसीकरण केले जाईल. तर, टप्प्याटप्पाने अनेक लसीकरण केंद्रांना १४ तास लसीकरणासाठी वेळ वाढवून दिला जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात राजावाडी रुग्णालयासह आणखी पाच रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचारी डबल शिफ्टमध्ये काम करतील. त्यामुळे आता नागरिकांना सकाळी ७ ते रात्री ९ या दरम्यान लस घेता येईल. या सुविधेमुळे आणखी चांगला आकडा गाठण्यास मदत होईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

८ मार्च रोजी ६५ केंद्रांवर ४० हजार, ५०२ लोकांना लस देण्यात आली. मात्र, गेल्या सहा दिवसांच्या आकडेवारीनुसार, १०० पेक्षा जास्त लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांचे सरासरी लसीकरण हे जवळपास ४१ हजारांपर्यंत झाले. १८ मार्च रोजी ९१ केंद्रांवर ३९,६४४ लोकांचे लसीकरण झाले. १९ मार्च रोजी ९२ केंद्रांवर ही संख्या ४२,७४० वर पोहाेचली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ९४ केंद्रांवर ४९,५४७ एवढ्या लोकांचे लसीकरण करण्यात आले.

राजावाडी रुग्णालयाचा समावेश
१४ तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयांमध्ये राजावाडी रुग्णालयाचाही समावेश आहे. मंगळवारपासून येथे १४ तास लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम केले जाईल. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असून सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत लसीकरण सुरू राहील. लोक सकाळी जरी आले तरी रजिस्ट्रेशनसाठी थांबावे लागत हाेते. आता मात्र त्यांचा वेळ वाचेल, असे राजावाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितले.

 

Web Title: Corona Vaccine: A 14-hour vaccination campaign soon; Information of Municipal Additional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.