Corona Vaccine: ‘वाॅक इन’ पद्धतीमुळे लसीकरणात १५% वाढ; राज्यातील आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 08:19 AM2021-01-29T08:19:46+5:302021-01-29T08:20:23+5:30
राज्याच्या सातव्या दिवशी लसीकरण लाभार्थ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांनी वाॅक इन लसीकरणाचा पर्याय निवडला होता, तर मुंबईत वाॅक इनचे प्रमाण जवळपास ६० टक्के होते
स्नेहा मोरे
मुंबई : राज्यात लसीकरण सुरू झाले त्यावेळेस ही प्रक्रिया कासवगतीने सुरू होती, शिवाय या प्रक्रियेत ‘कोविन’मुळेही तांत्रिक अडचण आली. मात्र, त्यानंतर वाॅक इन लसीकरणामुळे राज्याच्या लसीकरणात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. राज्यात लसीकरणाच्या सातव्या दिवशी ४१ हजार ४७० कर्मचाऱ्यांनी लस घेतली.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि पहिला टप्पा पार करण्यासाठी दिवसाला ४० हजार कर्मचाऱ्यांना लस देणे गरजेचे आहे. मात्र, राज्यात हे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने वाॅक इन लसीकरणाचा निर्णय घेतला. यामुळे लसीकरणाची प्रक्रिया सुलभ होऊन अधिकाधिक कर्मचारी लसीकरणासाठी पुढे येत असल्याचे दिसून आले.
राज्यात लसीकरणाच्या सहाव्या दिवशी ४८ हजार ३३१ चे लक्ष्य होते, यात ३५,८१६ कर्मचाऱ्यांनी लस घेतली, तर सातव्या दिवशी ५३,९०० कर्मचाऱ्यांचे लक्ष्य होते, यात ४१, ४७० कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली. मुंबईत सहाव्या दिवशी ६,५०० चे उद्दिष्ट होते, यावेळी ५ हजार ५ कर्मचाऱ्यांनी लस घेतली, तर सातव्या दिवशी ७, ७०० चे लक्ष्य होते, यात ५,१९७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मुंबईत आतापर्यंत २२ हजार ३६१ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून राज्यात आतापर्यंत १ लाख ७८ हजार ३७१ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
राज्याच्या सातव्या दिवशी लसीकरण लाभार्थ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांनी वाॅक इन लसीकरणाचा पर्याय निवडला होता, तर मुंबईत वाॅक इनचे प्रमाण जवळपास ६० टक्के होते. राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे यांनी सांगितले, ‘कोविन’मधील तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून त्यात सुधारणा होत आहेत. लसीकरण प्रक्रियेचे ७० टक्के काम कोविनद्वारे होत असून ३० टक्के काम मनुष्यबळाद्वारे नोंदणी पद्धतीने करण्यात येत आहे. लसीकरण लाभार्थ्यांची संख्या दिवसागणिक वाढविण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.